जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिठ्ठीने एक जागा भाजपकडे गेली. राष्ट्रवादीला केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला.
दरम्यान, सुरुवातीला या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. मात्र एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर निवडणुकीत बाजी मारल्याने ही नगरपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.