Monday, January 20, 2025
Homeदेशएनडीआरएफची कार्यपद्धती प्रेरणादायी : पंतप्रधान

एनडीआरएफची कार्यपद्धती प्रेरणादायी : पंतप्रधान

नवी दिल्ली(हिं.स.) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल – एनडीआरएफ च्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीआरएफ सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “एनडीआरएफ दलातील मेहनती सदस्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. अनेक बचाव आणि मदत विषयक उपाययोजनांमध्ये आणि बहुतेकदा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करण्यात या दलाचे कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. एनडीआरएफचे धाडस आणि व्यावसायिकता अत्यंत प्रेरणादायी आहेत. या दलाच्या भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा. आपत्ती व्यवस्थापन हा सरकारसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपत्ती येऊन गेल्यानंतरच्या काळात मदत कार्यातील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या सक्रीय दृष्टीकोनासोबतच आपल्याला आपत्तींच्या प्रती लवचिक असलेल्या पायाभूत सुविधांचा देखील विचार करायला हवा आणि या विषयातील संशोधनावर भर द्यायला हवा. भारताने ‘आपत्ती व्यवस्थापन सुविधांसाठी संयुक्त आघाडी’च्या रुपात काही प्रयत्न सुरु केले आहेत. कोणत्याही प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित आणि मालमत्ता यांचा अधिकाधिक बचाव करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या एनडीआरएफच्या पथकांचे कौशल्य अधिक चांगले करण्यासंबंधी काम करीत आहोत. ”
मुलांच्या लसीकरणाचा वेग कायम ठेवूया

कोरोना संकटाच्या सावलीत भारतात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरण अभियानाने लक्षणीय कामगिरी करीत जवळपास ५० टक्क्यांहून जास्त किशोर, किशोरींना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य यंत्रणेचे-मुलांची प्रशंसा करीत विशेष आवाहन केले.

डॉ.मनसुख मांडवीय यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले की, ” तरुण आणि युवा भारत आपल्याला मार्ग दाखवीत आहे! ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. आपण लसीकरणाचा हाच वेग कायम ठेवूया. लसीकरण करून घेणे आणि कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्व एकत्रितपणे या महामारीशी लढा देऊया.” असे आवाहन त्यांनी केले.

‘ मन की बात’साठी प्रेरणादायी कथा पाठवा : मोदी

जानेवारी महिन्याच्या पहिल्या ‘ मन की बात’ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना कथा पाठवण्याचे आवाहन केले आहे. या महिन्याच्या ३० तारखेला नववर्षाची पहिली ‘ मन की बात’ आहे. मला खात्री आहे, आपल्याकडे अनेक प्रेरणादायी जीवनकथा आणि संबंधित विषयांवर माहिती आहे. माय गोव्ह किंवा नमो अप्लिकेशन वर पाठवा. आपला संदेश १८००११७८०० माध्यमातून ध्वनिमुद्रित करा, असे मोदींनी म्हटले आहे. मोदी रविवार, ३० जानेवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८५ वा भाग असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -