मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या प्रस्तावामुळे शाळा सोमवारपासून (२४ जानेवारी) पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतरच्या काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
निर्णय आल्यानंतर शाळा सुरु करण्यासंबंधी प्रक्रियेला सुरुवात होईल. स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय व्हावा अशीच आमचीही इच्छा आहे. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण व्हावं यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर येऊन लसीसकरणाची विनंती केली आहे. तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही लस घेऊनच शाळेत यावं असंही सांगणार आहोत,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन नाराजी आणि विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.