त्रिनिदाद (वृत्तसंस्था) : युवा (१९ वर्षांखालील ) वनडे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गटवार साखळीमध्ये ( ब गट) बुधवारी (१९ जानेवारी) भारतासमोर आयर्लंडचे कडवे आव्हान आहे. दोन्ही संघांनी विजयी सलामी दिल्याने या गटातील एक चुरशीची लढत अपेक्षित आहे.
भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले. युगांडाला हरवत आयर्लंडनेही विजयी सुरुवात केली. एका सामन्यानंतर प्रत्येकी दोन गुण खात्यात असलेल्या उभय संघांसमोर सातत्य राखण्यासह गुणतालिकेत पहिल्या दोन संघांतील स्थान कायम ठेवण्याचे चॅलेंज आहे.
यापूर्वी, दोन्ही संघ बांगलादेशमध्ये २०१६मध्ये झालेल्या युवा वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. त्यात भारताने बाजी मारली. त्यामुळे . त्रिनिदादमधील टॅरौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत भारताचे पारडे किंचित जड आहे. यश धूल आणि सहकाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी मात केली. त्यात कर्णधार धूलसह डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल तसेच मध्यमगती गोलंदाज राज बावा यांनी मोलाचा वाटा उचलला. मात्र, सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. अंगरिक्ष रघुवंशी आणि हरनूर सिंग या बिनीच्या जोडीला सूर गवसला नाही. वनडाऊन शेख रशीदने कर्णधार यशला चांगली साथ दिली. मधल्या फळीत निशांत सिद्धू आणि अष्टपैलू राज बावा यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परंतु, अष्टपैलू कौशल तांबे याला हाताशी धरून धूलने भारताचा डाव सावरला. संघनायक धूल परतल्यानंतर शेपूट न वळवळल्याने भारताला डावातील संपूर्ण षटकेही खेळून काढता आली नाहीत. दमदार सुरुवात करणाऱ्या आयर्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध भारताच्या सर्वच फलंदाजांची कसोटी असेल. त्यांनी मागील लढतीतील चुका टाळल्यास फलंदाजी उंचावण्यास फारशी अडचण येणार नाही. विकी ओस्तवाल आणि राज बावा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली तरी रवी कुमार आणि निशांत सिद्धूला विकेट मिळाली नाही. राज्यवर्धन हंगर्गेकरने अर्ली ब्रेक थ्रु मिळवून दिला तरी त्याला एकाच विकेटवर समाधान मानावे लागले. कौशल तांबे यालाही गोलंदाजीत छाप पाडता आली नाही.
आयर्लंडने युगांडा संघाला ३९ धावांनी हरवले तरी विकेटकीपर-फलंदाज जोशुआ कॉक्स आणि मध्यमगती गोलंदाज मॅथ्यू हंफ्री यांनी छाप पाडली. कॉक्सने नाबाद शतक झळकावल्याने आयर्लंडला डावाची सर्व षटके खेळून काढता आली. हंफ्रीच्या अचूक माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी नांगी टाकली. तुलनेत भारताची कामगिरी चांगली झाल्याने आयर्लंडचा सर्वच आघाड्यांवर कस लागेल.