दापोली : दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवसेना राष्ट्रवादीने १७ पैकी १४ ठिकाणी बाजी मारत नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादीने ८ तर शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवला आहे.
दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत कलहाचा फायदा उचलत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरुन दिसून आले. येथे भाजपाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या बंडखोर समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्या.
या निवडणुकीत शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे रामदास कदम आणि मातोश्रीच्या निकटचे समजले जाणारे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना बाजूला ठेवत यावेळी सगळी सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या रामदास कदम समर्थकांनी दापोलीत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेसमोर आव्हान निर्माण होईल, असे वाटले होते. मात्र, ही शक्यता पूर्णपणे फोल ठरली आहे.
अनिल परब यांच्या मदतीला उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि माजी आमदार संजय कदम हे धावून आल्याने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना जोरदार धक्का बसला आहे.
एकुण जागा – १७
राष्ट्रवादी- ८
शिवसेना- ६
इतर(अपक्ष)- २
भाजप- १
टांगर ग्रामपंचायतीत झाली पहिल्यांदाच पोटनिवडणूक
दापोली तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत टांगर येथे २ सदस्यपदासाठी पहिल्यांदाच पोटनिवडणूक झाली. याआधी टांगर आणि गणपतीपुळे गावातील लोक ग्रामसभा घेऊन उमेदवार ठरवून त्यांची बिनविरोध निवड करत असत. यावेळी मात्र काही सदस्यांनी आव्हान दिल्याने येथे निवडणूक घ्यावी लागली.
या ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार वसंत दगडू मोरे यांना १५० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार संदीप दादाभाई पाटणे यांना ५३ मते मिळाली.
तर प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार सौ. सुविधा सुनिल पाटील यांना १०१ मते मिळाली. तर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. सायली सिताराम जागडे यांना ९५ मते मिळाली.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १ मध्ये ४ मत आणि प्रभाग क्रमांक २ मध्ये २ मत नोटाला मिळाली आहेत. त्यामुळे नोटाला मत देणारे हे सहा जण कोण आहेत, याचीच चर्चा आता गावात रंगली आहे.