
- कॉ. अरुण कडू
एन. डी. पाटील आणि मी रयत शिक्षण संस्थेत एकाच वेळी काम केलं. त्यांच्या शिस्तीत काम करण्याची संधी मला मिळाली. अतिशय परखड मतं, डाव्या विचारांचा प्रभाव, शेतकरी-कामगारांविषयी आस्था तसंच शिक्षणाविषयी प्रचंड तळमळ ही त्यांची वैशिष्ट्य. ते शरद पवार यांचे नातेवाईक आणि मी पवार यांच्या विचारामधून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेलो. वास्तविक आमची वैचारिक जवळीक व्हायला हवी होती; परंतु बऱ्याचदा ते पवारांवर टीका करायचे, त्या वेळी आमची गोची व्हायची...
वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या; परंतु नातेसंबंधांतल्या दोन कुटुंबांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध कसे असावेत, या दोन्हींचा ताळमेळ कसा राखावा याचं पवार कुटुंबीय आणि एनडी पाटील यांच्याइतके प्रगल्भ उदाहरण महाराष्ट्रात दुसरं आढळणार नाही. पवार यांचा प्रवास काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, पुन्हा काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस असा झाला; परंतु एन. डी. कायम शेकापमध्ये राहिले. काँग्रेस आणि शेकापची विचारधारा सारखीच असली आणि पवार आणि एन. डी. यांचं नातं मेहुण्याचं असलं, तरी या दोघांनी कधीही नात्यात राजकारण आडवं येऊ दिलं नाही. मीही सुरुवातीला कम्युनिस्ट होतो; परंतु नंतर पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. जिल्हा परिषदेचा अध्यक्षही झालो. मात्र, माझा आणि एन. डींचा संबंध रयत शिक्षण संस्थेमुळे आला. ते रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आणि मी उत्तर विभागीय सल्लागार समितीचा अध्यक्ष. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकांमध्ये मला जे एन. डी. दिसले, ते अतिशय अभ्यासू, विविध विषयांचे जाणकार तसंच जागतिक शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना बहुजनांसाठी ते कितपत उपयुक्त आहे, तसंच ते रयत शिक्षण संस्थेला परवडणारं आहे का, याचा विचार करायचे. संपन्न शाखांमधला निधी कमकुवत शाखांना पुढे आणण्यासाठी वापरला पाहिजे, यावर ते ठाम होते. नगर, सातारा या ठिकाणच्या शाखांची त्यांना फार काळजी नव्हती; परंतु मोखाड्याच्या शाखेची खूप काळजी असायची. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची ते चिंता करायचे.
रयत शिक्षण संस्था वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम का सुरू करत नाही, अशी विचारणा रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण कार्यकारिणीच्या बैठकीत व्हायची; परंतु रयत शिक्षण संस्था ही बहुजनांची आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणं संस्थेला झेपणारं नाही आणि कुणाकडून पैसे घेऊन शिकवणं रयत शिक्षण संस्थेच्या प्रवृत्तीशी इमान सोडल्यासारखं होईल, असं ते सांगायचे. त्यांची काही मतं परखड होती. त्यांचं नेतृत्व अतिशय पुरोगामी होतं. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेतील विज्ञान प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्था, उपक्रमांना ते मदत करायचे. मी काही काळ नगर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष होतो. त्या काळात मला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन झालं. रयत शिक्षण संस्थेत ते शिस्तबद्ध काम स्वतः करायचे आणि आम्हालाही शिस्तबद्ध काम करायला भाग पाडायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही अक्षरशः तावून सुलाखून निघालो. शिक्षण संस्थांमध्ये काम करताना विश्वस्तांनी ठराविक पथ्यं पाळली पाहिजेत, यावर त्यांचा भर असायचा. रयत शिक्षण संस्थेत त्यांच्या कामाची वेगळी छाप होती. त्यांचा एक दरारा होता.
काँग्रेस सत्ताधारी तर शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष. त्यामुळे कोणत्याही पातळीवर तडजोड नाही. स्वाभाविकपणे शरद पवार आणि एनडी पाटील राजकारणात सक्रीय झाले, ते परस्परांचे विरोधक म्हणूनच. त्यांच्यात तात्विक वादाचे अनेक प्रसंग घडले. पवार मुख्यमंत्री तर एन. डी. विरोधात. शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला धारेवर धरलं. प्रा. एन. डी पाटील यांनी अखेरच्या क्षणापर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी योगदान दिलं. अगदी गेल्या वर्षीही त्यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी पुढाकार घेतला. ते वकिलांना सर्व माहिती पुरवत होते. महाराष्ट्रानं बेळगावचा सीमा लढा जिंकायला हवा, या भावनेने न्यायालयीन लढ्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्याला व्हावं की, कोल्हापूरला हा वाद निर्माण झाला, तेव्हा त्यांनी पुण्यापेक्षा कोल्हापूर इथे हे खंडपीठ होणं कसं योग्य आहे आणि कोल्हापूरला ते झालं, तर किती जिल्ह्यांचा फायदा होईल, हे पटवून दिलं.
एन. डी. म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. पवार यांच्या सरकारविरोधात कधी काळी संघर्ष करणारे एन. डी. पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री होते. त्यावेळी दोघांनी एकोप्यानं काम केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या, त्या अखेरपर्यंत; परंतु राजकीय वाटा वेगळ्या असल्या, तरी दोघांच्या पुरोगामित्वात, वैचारिकतेत बरंच साम्य होतं. राजकारणात पवार यांच्यावर अगदी टोकाची टीका करणारे एन. डी. कौटुंबिक सोहळ्यात मात्र वेगळे असायचे. त्यांनी राजकारण कधीही कुटुंबापर्यंत येऊ दिलं नाही. एन. डी. पाटील यांनी कोपरगावमधल्या एका कार्यक्रमात एकदा म्हटलं होतं की, महाराष्ट्रात मी अन्य कोणत्याच नेत्यांवर केली नसेल तेवढी टीका शरद पवार यांच्या राजकारणावर, त्यांच्या भूमिकेवर केली आहे; कारण समोर तेच होते. प्रस्थापित राजकारणात ज्यांच्यावर टीका केल्याशिवाय माझं राजकारणच होऊ शकत नव्हतं. त्या काळात मी माझी भूमिका निभावत राहिलो; परंतु तरीही त्याबद्दल स्वतः शरद पवार अथवा पवार कुटुंबीयांमधल्या अन्य कुणीही नाक मुरडल्याचं मला जाणवलं नाही.
पवार कुटुंबासह एनडींना बांधून ठेवणारा धागा म्हणजे शरद पवार यांच्या आई आणि एनडी पाटील यांच्या सासूबाई शारदाबाई पवार. त्यांचे एनडींवरही पुत्रवत प्रेम होते. घरातली सगळी मंडळी त्यांना बाई म्हणत, तसे एनडीही त्यांना बाई म्हणत. शारदाबाईंच्या एनडीवरील प्रेमाची गोष्ट सांगायची तर १९६७च्या निवडणुकीतली एक आठवण आवर्जून सांगायला हवी. त्या निवडणुकीत शरद पवार यांच्या प्रचारासाठी शारदाबाईंनी एक मेगामाईक आणला होता. असा माईक फक्त त्यांच्यासाठीच आणला नाही, तर एन. डी. पाटील यांच्यासाठीही आणला होता, अशी आठवण सांगितली जाते. एनडी पाटील शेतकरी कामगार पक्षाचं पूर्णवेळ काम करत होते. त्यावेळी त्यांचं वय २९ वर्षं होतं आणि प्राध्यापकाची नोकरी सोडून दिली होती. ते वकिलीचं शिक्षण घेत होते, परंतु वकिली करणार नाही, हे स्पष्ट केलं होतं. तशा परिस्थितीत शारदाबाईंनी आपली मुलगी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. लग्न ठरवताना भाई उद्धवराव पाटील, दाजिबा देसाई, नाना पाटील अशी त्या काळच्या महाराष्ट्राच्या राजकारणातली दिग्गज नेतेमंडळी होती. एका अर्थानं एनडींचं लग्न लावून देण्यासाठी शारदाबाईंनीच पुढाकार घेतला होता.
शरद पवार आणि एनडी पाटील राजकीय विरोधक असले, तरी रयत शिक्षण संस्थेत त्यांनी सुमारे चार दशकं एकत्र काम केलं. शरद पवार अध्यक्ष आणि एन. डी. पाटील कार्याध्यक्ष असले तरी रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात अखेरचा शब्द एन. डी. पाटील यांचा असायचा. पवार कुटुंबातले छोटे-मोठे मतभेद मिटवण्याची जबाबदारी काही वेळा एन. डी. पाटील यांच्यावर यायची आणि एनडींचा शब्द कधी कुणी पडू दिला नाही. गेल्या आठ वर्षांपासून एनडींवर उपचार सुरू होते. त्यांची एक किडनी काढली होती. अॅडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल, असे उपचार करू नयेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही क्लिष्ट उपचार केले नाहीत, असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अशोक भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची शुद्ध हरपली होती. अखेर त्यांच्या निधनाची बातमी आली. एन. डी. पाटील यांना मे २०२१मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली. असो. आता राहिल्या फक्त आठवणी. त्याच्यासारखा सर्वस्व पणाला लावून लढणारा नेता विरळच.