Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीपंतप्रधान मोदींवरील वक्तव्याने नाना पटोले वादात; भाजप आक्रमक

पंतप्रधान मोदींवरील वक्तव्याने नाना पटोले वादात; भाजप आक्रमक

मुंबई : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलिस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर टीकेची राळ उठवली.

भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने १६ जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा या गावातील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पटोले यांच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर पटोले यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांमध्येही भाजपकडून तक्रारी नोंदविल्या जाणार आहेत.

व्हिडीओनंतर भाजप नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेसवाल्यांच्या मनात एवढा द्वेष आहे की ते पंतप्रधानांना मारण्यापर्यंत बोलत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. काँग्रेस पक्षाच्या या विधानाचा पंजाबमध्ये झालेल्या घटनेशी संबंध आहे का?, असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे. तर महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील नाना पटोलेंवर टीका केली आहे, “काँग्रेसचे नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही. मोदींच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पटोले यांनी, नाना पटोले यांचे मोदींविषयीचे वक्तव्य भयंकर आहे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करून आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्षं झाली राजकारण करतोय. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारू शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभे आहे….”

प्रचारसभेदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबत बोललो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -