डॉ. नंदकिशोर कपोते, सुप्रसिद्ध नर्तक
पं. बिरजू महाराज यांचं निधन ही मनाला चटका लावून गेलेली घटना आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनचा आमचा स्नेह असल्यामुळे त्यांच्याबरोबर व्यतित केलेला एक-एक क्षण आज मला आठवत आहे. गुरुजींचा पट्टशिष्य म्हणवून घेणं, ही माझ्यासाठी नेहमीच भूषणास्पद बाब होती आणि ती कायमच राहणार आहे. उत्तर भारतातील कथक नृत्यशैली ही एक नैसर्गिक अर्थात सर्वांगसुंदर नृत्य, नाट्य यांनी परिपूर्ण अशी शैली आपलं खास वेगळेपण टिकवून आहे. या नृत्यशैलीबाबत बोलायचे झाले, तर सर्वप्रथम नजरेसमोर येतात ते लय आणि अभिनयाचे बादशहा पद्मविभूषण कथक सम्राट पं. बिरजू महाराज! आता ते आपल्याला सोडून गेले असले तरी या विश्वाशी असणारं त्यांचं नातं आणि त्याचं योगदान नेहमीच अतूट राहणार आहे.
पं. बिरजू महाराज यांनी कथक विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. कथकचा प्रचार आणि प्रसार करण्यात या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराचं मोलाचं योगदान आहे. कथक म्हणजे बिरजू महाराज आणि बिरजू महाराज म्हणजे कथक, हे समीकरण कायमचं रूढ झालं आहे. कथक नृत्याची चार घराणी आहेत. लखनऊ घराणं, जयपूर घराणं, बनारस घराणं आणि रायगड घराणं. पं. बिरजू महाराज हे लखनऊ घराण्याचे. पं. बिरजू महाराजांच्या अथक परिश्रमामुळेच लखनऊ घराणं उंच शिखरावर पोहोचलं. लखनऊ घराण्याचे मूळ प्रवर्तक स्व. पं. ईश्वरी प्रसाद मिश्र. या घराण्याच्या नऊ पिढ्या झाल्या. बिरजू महाराज हे सातव्या पिढीतले होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी लखनऊ इथे झाला. वडील स्व. अच्छन महाराजजी यांच्याकडून त्यांना नृत्याचं शिक्षण मिळालं. बिरजू महाराज अवघे साडेसात वर्षांचे असताना अच्छन महाराजजींनी त्यांना गंडाबंध शिष्य केलं. बिरजू महाराज नऊ वर्षांचे असताना अच्छन महाराज याचं देहावसान झालं. नंतर त्यांना पुढे आणण्यात सर्वात मोठा वाटा त्यांच्या आई, अम्माजींचा राहिला. अम्माजींनी त्यांना बिंदादीन महाराजांच्या ठुमऱ्या शिकवल्या. बिरजू महाराजांना काका पं. शंभू महाराज आणि पं. लच्छु महाराज यांच्याकडूनही नृत्यांचं मार्गदर्शन लाभलं. केवळ साडेसात-आठ वर्षांचे असताना पं. बिरजू महाराजांनी दिल्ली येथील ज्युबिली टॉकीजमध्ये नृत्याचा जाहीर कार्यक्रम करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं.
स्व. पं. अच्छन महाराजजींची शिष्या स्व. डॉ. कपिला वात्स्यायन यांनी बिरजू महाराजांना लखनऊहून दिल्लीला आणलं आणि केवळ १४ वर्षांचे असताना बिरजू महाराज संगीत भारती, दिल्ली इथे नृत्य शिकवू लागले. ते तेथे साडेचार वर्षं होते. त्यानंतर महाराजजींना ‘भारतीय कला केंद्र’ इथे आमंत्रित केलं गेलं आणि तिथे महाराजजी नृत्य शिकवू लागले. काही काळानंतर संगीत नाटक अकादमीच्या वतीनं कथक केंद्राची स्थापना झाली आणि बिरजू महाराज तिथे मुख्य गुरू म्हणून नियुक्त झाले. तिथे बॅले विभागाचेही ते संचालक होते. १९९८मध्ये पं. बिरजू महाराज कथक केंद्रातून निवृत्त झाले आणि दिल्लीमध्ये स्वतःची ‘कलाश्रम’ नावाची कथक नृत्य संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कथक नृत्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य केलं.
मी महाराजजींना प्रथम भेटलो १९७४मध्ये. त्यावेळी मी पुण्याच्या ‘कलाछाया’ संस्थेत नृत्य शिकत होतो. तिथे एका कार्यक्रमासाठी पं. बिरजू महाराजजी आले होते. एका झाडाखाली कट्ट्यावर अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारे पं. बिरजू महाराज बसलेले मी पाहिले. तेव्हा मी जवळ गेलो आणि त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यांनी माझं नाव विचारलं. हीच महाराजजींशी माझी पहिली भेट. त्याच रात्री बालगंधर्व रंगमंदिरात महाराजजींचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या आधी संस्थेच्या वतीनं मी महाराजजींना रंगमंचावर नारळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर आयुष्यात प्रथमच मी महाराजजींचं सर्वांगसुंदर नृत्य पहिलं आणि त्याचवेळी मनाशी ठरवलं की, मी महाराजजींकडेच नृत्य शिकणार!
पुढे मी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आणि दिल्लीला कथक केंद्र (संगीत नाटक अकादमीचा विभाग) सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारमध्ये पं. बिरजू महाराजांकडे कथक नृत्याचं उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलो. गुरुशिष्य परंपरेनुसार मी महाराजजींकडे दहा वर्षं शिक्षण घेतलं. त्या काळी गुरू शिष्याची परीक्षा घेत असत. शिष्य योग्य पात्रतेचा आहे का, हे बघत असत. तेव्हाच्या त्या पद्धतीनुसार सुरुवातीला काही दिवस मला महाराजजींनी काहीच शिकवलं नाही; परंतु ते माझ्याकडे बारकाईनं लक्ष देत असत. मी महाराजजींची सर्व कामं करत असे. असंच एकदा रात्री मी महाराजजींचे पाय दाबत होतो. त्यानंतर महाराजजी झोपले, असं समजून मीही झोपायला जायला उठलो. तेवढ्यात महाराजजी जागे झाले आणि म्हणाले, ‘नंदू, खडे हो जाओ’. तेव्हा त्यांनी मला आमद (कथक नृत्याचा एक प्रकार) शिकवला. अशा प्रकारे रात्री एक वाजता माझा महाराजजींकडे कथक नृत्याचा श्री गणेशा झाला. त्यानंतर महाराजजींनी मला भरभरून शिकवलं.
शिक्षणाचा हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या काळात अधिकच बहरला होता. याच काळात मला त्यांनी ऑनलाइन शिकवलं. २९ मे २०२०पासून त्यांनी माझा क्लास घेणं सुरू केलं. वयाच्या या टप्प्यावर असताना ऑनलाइन शिकवण्याचं तंत्र आत्मसात करून त्यांनी मला नृत्याचे धडे देणं हे फार भाग्याचं होतं. आमची ऑनलाइन शिकवणी त्यांच्या निधनाआधी पंधरा दिवसांपर्यंत सुरू होती. दर रविवारी आमचा ऑनलाइन क्लास होत असे. या वयातही त्यांची शिष्यांना शिकवण्याची विलक्षण उर्मी होती. इतकंच नव्हे, तर शेवटच्या दिवशीही नेहमीप्रमाणे मी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या निधनापूर्वीच्या दोन तास आधी हा फोन झाला होता. फोनवर आमचं छान बोलणं झालं होतं. तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या अवस्थेत असताना ते मला म्हणाले होते, ‘नंदू, मेरे लिए प्रार्थना करो’. ते ऐकून मी म्हणालो, ‘आप जल्दी अच्छे हो जाएंगे और पुना आएंगे.’ यावर ते हसले होते. दुसऱ्या दिवशी याच वेळी मी त्यांना फोन करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दुर्दैवानं ती वेळ आली नाही. त्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी येऊन थडकली. त्या वेळी त्यांचं एक वाक्य मला आठवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडून पुण्याला येताना मी भावुक झालो होतो. त्यांना सोडून येताना मन कातर झालं होतं. माझी ती अवस्था पाहून ते म्हणाले होते, ‘जब तक तुम्हारे पैरों में घुंगरू है, तब तक मैं तुम्हारे साथ हूं’! आता हाच माझ्या जगण्याचा मंत्र आहे. ते नेहमीच आपल्याबरोबर असतील. महाराजजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
हिमालयाएवढं व्यक्तिमत्त्व
सुचेता चापेकर, प्रसिद्ध नृत्यांगना
कथक नृत्यशैलीत महाराजजींचं स्थान हिमालयाएवढं मोठं होतं. अभिनयाच्या बाबतीत आम्ही बालसरस्वतींना जसं एक प्रमाण मानतो, तेच स्थान कथकमध्ये महाराजजींचं होतं. त्यांच्या घराण्यात लच्छू महाराज, शंभू महाराज असे अनेक दिग्गज झाले असले तरी महाराजजींचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवायचं. त्यांना संगीताचं उत्तम ज्ञान होतं. अशा दिग्गजांना प्रत्यक्ष पाहायला मिळाल्यामुळे आमची पिढी अत्यंत नशीबवान आहे असं मला वाटतं. आता पुढच्या पिढीला केवळ त्यांची रेकॉर्डिंग्ज पाहूनच समाधान मानावं लागेल.
महाराजजींनी कथक विश्वावर, सादरीकरणावर कायमचा ठसा उमटवला होता. पुढचा अनंत काळ तो कायम राहील, यात शंका नाही. ते शेवटपर्यंत कलेच्याच विचारात रमले. शेवटचे काही दिवस वगळता वयाची ऐंशी वर्षं उलटूनही ते अत्यंत कृतिशील होते. त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं साम्राज्य उभं केलं, असंच म्हणावं लागेल. त्यांना आपल्याच नव्हे तर सर्वच शैलींविषयी आदर होता. परंपरा आणि नवता याचा योग्य ताळमेळ साधत, परंपरेला धक्का न लावता त्यांनी अनेक प्रकारे नवता आणली. त्यातून त्यांनी वेगवेगळे विचार पुढे मांडले. कथकचं स्वरूप बदलून ते नव्या ढंगात, नव्या अंगानं सादर करण्यातही त्यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे. कथकशी एकजीव झालेलं असं ते व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांची आठवण आणि शिकवण कायमच आपल्याबरोबर राहील. महाराजजींना विनम्र आदरांजली.