नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पटोले यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर, आज भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात कोराडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
तसेच, पटोले यांच्याविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन करणार, असा पवित्रा बावनकुळे यांनी घेतला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जमावबंदी असताना जमाव निर्माण करणे, समाजात तेढ निर्माण करणे, पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या षडयंत्र करणाऱ्यांना पाठबळ देणे, करोना नियमांचे पालन न करणे, असे आरोप बावनकुळे यांनी तक्रारीत केले आहेत. तसंच, जो पर्यंत तक्रारीची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे यांनी केली आहे.
नाना पटोले यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पटोले यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांमध्येही भाजपकडून तक्रारी नोंदविल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंच्या नागपुरातील घरी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे.