नवी दिल्ली : गुप्तचर यंत्रणांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्यासंदर्भातील इशारा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या नऊ पानी अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिलंय. समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका असल्याचं अहवालात म्हटले आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आशियामधील पाच देशांच्या मुख्य नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये कझाकिस्तान, किर्गिजस्तान, तझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांचा समावेश असू शकतो असं सांगण्यात येतंय.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गटांकडून या हल्ल्यासंदर्भातील कट रचण्यात आल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांना मिळालेत. या कटानुसार मान्यवरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा या दहशतवादी गटांचा विचार असल्याचंही अहवालात म्हटलंय. हे हल्ले ड्रोन्सच्या मदतीने केले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.
लश्कर-ए-तोयबा, द रियान्सर फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिजबुल्ल मुजाहिद्दीन सारख्या गटांचा हा कट रचण्यामागे हात असल्याचं सांगितलं जातं आहे. खलिस्तानवादी गटांकडूनही पाकिस्तानमध्ये या कटाच्या पार्श्वभूमीवर हलचाली सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. पंजाब आणि इतर राज्यांमध्ये हल्ला करण्याचा या गटांचा इरादा असल्याचे संकेत मिळत आहेत.
फेब्रुवारी २०२१ च्या अहवालानुसार खलिस्तानी गटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकी आणि भेटींच्या ठिकाणी हल्ल्यांचा कट रचला जात असल्याचे संकेत मिळाले होते.