कराची (वृत्तसंस्था) : भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने समर्थन केले. कोहली खूप क्रिकेट खेळला आहे आणि त्याला काय बरोबर आणि काय चूक हे माहीत आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
माझ्या मते हे बरोबर आहे. विराटने भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि संघाचे चांगले नेतृत्व केले आहे. आणि माझा विश्वास आहे की तो योग्य निर्णय आहे. एक असा टप्पा येतो जिथे तुम्ही दबाव हाताळू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या कामगिरीला फटका बसतो. त्यामुळे मला वाटते की त्याने दीर्घकाळ आणि मोठ्या स्तरावर कर्णधारपद भूषवले आहे. एक फलंदाज म्हणून क्रिकेटचा आनंद घेण्याची हीच वेळ आहे, असे आफ्रिदीने म्हटले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-ट्वेन्टी विश्वचषक संपल्यानंतर कोहलीने या प्रकारातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. निवड समितीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगळे कर्णधार नको होते. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. घरी परतल्यानंतर कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा होऊ शकते.
विराट कोहलीने ४० कसोटी विजयांसह भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कारकीर्द संपवली. त्याचबरोबर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (५३), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (४८) आणि स्टीव्ह वॉ (४१) हे दिग्गज क्रिकेटपटू याबाबत त्याच्या पुढे आहेत.