
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज (सोमवारी, दि. १७) सकाळी पुणे मेट्रोतून प्रवास करत मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरद पवार यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला भेट दिली. तिथून त्यांनी मेट्रोतून पिंपरी चिंचवड महापालिका (पीसीएमसी) मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित त्यांच्यासोबत उपस्थित होते.
डॉ. दीक्षित यांनी मेट्रोच्या संपूर्ण कामाची शरद पवार यांना माहिती दिली. फुगेवाडी कार्यालयात मेट्रोकडून शरद पवार यांना मेट्रोच्या कामाबद्दलचे प्रेझेंटेशन देण्यात आले. शरद पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांशी संवाद साधत मेट्रोच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली.
पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोच्या विस्तारीकरणाचे देखील काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरातील सहा मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी सज्ज होणार आहेत. दरम्यान मेट्रोचे उदघाटन कधी होणार याबाबत मात्र मेट्रोकडून मौन पाळले जात आहे. उदघाटनाचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार मिळून घेणार असल्याचे मेट्रोकडून सांगितले जात आहे.