मुंबई : मुंबईत कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव वाढला होता. तो आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र तरीही मुंबई महापालिकेने मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड-19 प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्यांनी मुंबईतील विवाह नोंदणी सेवा (Marriage Registration Services) तात्पुरती थांबवली आहे. मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई मनपाच्या @mybmchealthdept तर्फे विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तारीख आणि वेळ निश्चिती पर्यायासह ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल.
नजीकच्या काळात यामध्ये व्हिडिओ केवायसी सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे.— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 15, 2022
मुंबई पालिकेने (BMC) यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये मुंबई पालिकेने म्हटले आहे की, मुंबईतील सध्याच्या COVID-19 परिस्थितीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
पालिकेने नमूद केले आहे की, विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र नियोजित भेटीसह ही सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील.
भेटीची तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल. पुढे जाऊन बीएमसी व्हिडिओ केवायसी पर्यायाची तरतूद देखील शोधत आहे, असे बीएमसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत सध्या ६० हजार ३७१ सक्रिय रुग्ण
काल मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी 7 हजार 895 वर पोहोचली आहे. मुंबईत शनिवारच्या तुलनेने रविवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास तीन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. मुंबईत काल दिवसभरात हजारो रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 11 रुग्णांचा काल दिवसभरात दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबईत काल दिवसभरात 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 20 हजार 387 इतकी आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर डबलिंग रेट हा 48 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचा ग्रोथ रेट हा 1.40 टक्के इतका आहे. तर सध्या 60 हजार 371 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.