Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

झुंजार नेतृत्व गमावले : शरद पवार

झुंजार नेतृत्व गमावले : शरद पवार

मुंबई : ‘आपण सार्वजनिक जीवनातील, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुन्या पिढीतील शिलेदाराला आणि एका झुंजार नेतृत्वाला गमावले आहे’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.


कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर येथे एनडी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले आणि आदरांजली वाहिली.


‘महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुन्या पिढीतील शिलेदाराला गमावले आहे. एनडी पाटील यांची विचारधारा ही जहाली होती आणि त्या विचारसरणीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. त्यांनी व्यक्तीगत सुख, घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता.


डाव्या विचारसरणीने सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजून उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी जे दरवाजे खुले केले त्यामध्ये कर्मवीरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिशेला होतो, ते त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक होते,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.



राज्यपालांना दुःख


माजी आमदार प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रा. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment