
दहिसरमध्ये प्राण्यांसाठी इलेक्ट्रिक शवदाहिनी
महापालिकेची मुंबईतील पहिलीच स्मशानभूमी
मुंबई : पाळीव प्राण्यांसाठी मुंबई महापालिकेची स्मशानभूमी असावी म्हणून दहिसर येथे पहिली स्मशानभूमी उभारली जात आहे. या स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी असणार आहे. त्यामुळे मुंबईत प्राण्यांसाठी महापालिकेची अशी पहिलीच स्मशानभूमी असणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतेय!
मुंबईतील पाळीव प्राण्यांसाठी खासगी स्मशानभूमी आहेत. मात्र पाळीव प्राण्यांसाठी महापालिकेची स्मशानभूमी असावी, यासाठी दहिसर येथील शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दहिसर येथे पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशानभूमी उभी राहत असून त्याचे सादरीकरण नुकतेच महापौर निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीत मुंबईत पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या मृत्यूनंतर विल्हेवाटीची समस्याही निर्माण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागात अशा स्मशानभूमी बांधाव्यात, अशी मागणी तेजस्विनी घोसाळकर यांनी महापौरांकडे केली.
प्रदूषणमुक्त स्मशानभूमी बनवण्यावर भर
महापौर पेडणेकर म्हणाल्या की, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त स्मशानभूमी बनवण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने दहिसर येथील कांदरपाडा येथे होणाऱ्या स्मशानभूमीसाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. तेजस्विनी घोसाळकर यांनी पाठपुरावा केल्यावर दहिसर स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांसाठी पहिली प्रदूषणमुक्त, इलेक्ट्रिक स्मशानभूमी उभी राहत आहे. त्यासाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही स्मशानभूमी पूर्णतः इलेक्ट्रिक असून त्यापासून प्रदूषण होणार नाही, असेही पेडणेकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या सात परिमंडळांत प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणार
दरम्यान पश्चिम उपनगरात पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास खादी ग्रामोद्योग संस्थेकडून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातात. मात्र महापालिकेची स्वतःची स्मशानभूमी नव्हती, मात्र आता महापालिकेकडून पहिली स्मशानभूमी उभारली जात आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षापासून महापालिकेच्या सात परिमंडळ विभागांत सात स्मशानभूमी प्राण्यांसाठी उभारल्या जाणार आहेत, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.