पुणे : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. त्यातच राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. पुण्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात १० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १० हजार १०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ५ हजार ३७५ जण आहेत. शनिवारी जिल्ह्यात १० हजार २८१ नवे कोरोना रुग्ण तर शुक्रवारी नवे रुग्ण सापडण्याचा आकडा १० हजार ७६ इतका होता. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
त्याचवेळी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या निम्याहून कमी आहे. रविवारी ५ हजार ४०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला असून काल दिवसभरात जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांची हीच संख्या शनिवारी पाच होती.
जिल्ह्यातील दिवसाभरातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 2 हजार 626, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 1 हजार 505, नगरपालिका हद्दीत 384, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 212 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.
दिवसातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 3 हजार 90, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 535, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 588, नगरपालिका हद्दीतील 161 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 31 जण आहेत. दिवसातील एकूण कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यू आहेत.