संस्कृतीबंध- अनुराधा परब
पृथ्वीचे शिलावरण हे माती आणि खडकांनी बनलेले आहे, हे आपण भूगोलामध्ये शिकलेलोच असतो. मात्र प्रत्येक ठिकाणची माती आणि खडक हे वेगवेगळे असतात. खडकांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे हा फरक पडतो. खडकांमध्ये असलेल्या खनिजांवर दोन प्रकारच्या प्रक्रिया होत असतात. दिवसभरातील कमी-अधिक होणारे तापमान आणि येणारा पाऊस. कमी-अधिक तापमानाचा खडकांवर होणारा परिणाम म्हणजे मोठ्या शिलाखंडाला या प्रक्रियेत भेगा पडून त्याचे तुकडे होत जाणे. त्यावर ज्या वेळेस पाऊस पडतो, त्यावेळेस या तुटलेल्या शिलाखंडांतील खनिजे वाहून जातात आणि त्यांची झीज होते. निसर्गामध्ये या दोन्ही प्रक्रिया सातत्याने होत असतात. कारण सर्व खडक गेली लाखो वर्षे उघड्यावरच आहेत. याच प्रक्रियेतून मोठ्या शिलाखंडांचे तुकडे होऊन मोठे खडक, दगड-गोटे असे करत त्यापासून अखेरच्या टप्प्यात माती तयार होते. त्या त्या ठिकाणची माती त्या ठिकाणी सापडणाऱ्या खडकांचे वैशिष्ट्य घेऊनच तयार होते. ही भौगोलिक प्रक्रिया आपण एकदा समजून घेतली की, नंतर कोकणचा परिचय असलेल्या लाल मातीमागची आणि पर्यायाने जांभा दगडामागचीही कूळकथा समजून घेणे सोपे जाते.
मुंबई किंवा अन्य ठिकाणांहून आपण रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या परिघामध्ये प्रवेश करताना सगळा परिसर अगदी झाडेझुडपेदेखील लालेलाल दिसायला लागतात. या लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर तिथे जवळपास निष्पर्ण वाटणाऱ्या डवरलेल्या जास्वंदीचा लाल रंगदेखील फिका वाटायला लागतो. चिऱ्याच्या बांधकामातील कौलारू घरे, वास्तू ही कोणत्याही ऋतूमध्ये तेवढीच लख्ख दिसतात. याचे इंगित हे त्या चिऱ्याच्या दगडाच्या वैशिष्ट्यामध्ये आहे. लाल माती हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्गामध्ये तर ती अंमळ अधिकच लाल दिसते. त्या साऱ्याचे वैशिष्ट्य इथल्या भूगोलामध्ये दडलेले आहे. या लालमातीप्रमाणेच कोकणाचा दुसरा परिचय म्हणजे तुफान पाऊस. साहजिकच इथे वाहणाऱ्या खाड्या, तुफान पाऊस यामुळे सिंधुदुर्गात आर्द्रताही अधिक असते. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या माध्यमातून येणारा बहुतांश पाऊस सह्याद्रीने अडवल्याने कोकणातच रिता होतो आणि म्हणून देशावर-पठारावर तुलनेने कमी बरसतो.
हा तुफान बसरणारा पाऊस हे काही आताचेच वैशिष्ट्य नाही, तर गेल्या ५५ लाख वर्षांपासून तो बरसतो आहे. आणि जांभा दगडाच्या निर्मितीचे हे महत्त्वाचे कारण आहे. कणकवलीचे वय निश्चित करण्याची प्रक्रिया आपण गेल्या भागात पाहिली. त्याचा संबंध अंटार्क्टिकाशी होता. तिथून तुटून हा भूखंड ज्या वेळेस दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात आला तेव्हा त्या वेळेस त्याला विषुववृत्त म्हणजे शून्य अक्षांश पार करावे लागले. विषुववृत्ताजवळच्या प्रदेशात तुफान पाऊस पडतो. अनेकदा हा पाऊस २४ तास असतो. साधारणपणे विषुववृत्ताच्या जवळ येण्याच्या प्रक्रियेस ५५ लाख वर्षांपूर्वी सुरुवात झाली आणि दक्षिण गोलार्धात असताना हा भूखंड प्रथमच तुफान पावसाला सामोरा गेला. त्यानंतर विषुववृत्त पार करून अतितुफान पावसाला सामोरे जाण्याची प्रक्रिया पार पडली, ती साधारणपणे १० हजार वर्षांपूर्वी. या दोन्ही प्रक्रियांमध्ये दोन प्रकारचे जांभा खडक कोकणात तयार झाले. मादागास्करजवळून येताना ६५ लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीतून सह्याद्रीची निर्मिती झाली होती. सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट हा खडकाचा प्रकार पाहायला मिळतो. हा बेसॉल्ट आणि त्याहीपूर्वी २३० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला सिंधुदुर्गातील पेनिन्सुलर नाईस या दोन्ही खडकांमधील खनिजे तुफान पावसात वाहून जात ते सच्छिद्र झाले. त्यामुळे रत्नागिरीतील जांभा हा बेसॉल्टपासून, तर सिंधुदुर्गातील बेसॉल्ट नाईसमधून तयार झालेला आहे.
खडकाचा जांभा हा प्रकार जगभरात सर्वप्रथम लक्षात आला तो केरळमध्ये. इंग्रजीमध्ये जांभा दगड जगभरात ‘लॅटराईट’ या नावाने ओळखला जातो; खरी गंमत म्हणजे हा इंग्रजी नसून चक्क केरळी आहे, असा उलगडा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील भूगर्भशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक, तज्ज्ञ डॉ. रेमंड दुरईस्वामी करतात.
या दगडावर पाणी असते किंवा तो ओला असतो, त्या वेळेस तो नाजूक भासमान होतो. मात्र ओलावा गेला की, अगदी टणक दिसतो. कोकणातील स्थानिक भाषेत त्याला ‘चिऱ्याचा दगड’ म्हणतात. अशा चिरेखाणी सिंधुदुर्गात बऱ्यापैकी आहेत. पावसांत दगडातून वाहून गेलेल्या खनिजांमध्ये बॉक्साईट असते आणि त्यामुळेच या चिऱ्याला लाल-केशरी, तर मातीला लाल रंग प्राप्त झाला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण चिऱ्याचा असा वापर घरांसाठी करता येतो. हे ज्या कोकणी माणसाला उमगले त्याच्या कौशल्याला दाद द्यायलाच हवी.
कोकणाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे, ते इथल्या सड्यावर असणाऱ्या कातळशिल्पांमुळे. ही कातळशिल्पेदेखील सड्यावरच्या जांभा दगडावरच कोरण्यात आली आहेत. सिंधुदुर्गामध्ये तर ती खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात.
या जांभ्याचे वैशिष्ट्य काही केवळ कोकणी माणसानेच नाही, तर गोव्यामध्ये आलेल्या पोर्तुगीजांनीही ओळखले. त्यामुळे त्यांनी गोव्यातील भलीमोठी चर्चेस जांभ्यामध्येच बांधली. त्याही आधी शिवछत्रपतींनाही जांभ्याचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे कोकणातील किल्ल्यांच्या रचनेत जांभ्या दगडाचाच वापर करून तटबंदी करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध विजयदुर्ग किल्ला हे त्याचे जिवंत उदाहरण.
(लेिखका ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक आहेत.)
[email protected]