Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीएसटीच्या ‘लेखा’ विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली

एसटीच्या ‘लेखा’ विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली

श्रीरंग बरगे यांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त झालेल्या मुंबई विभागातील तसेच एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना मिळवून देण्यामध्ये एसटी प्रशासनाच्या ‘लेखा’ विभागाने दिरंगाई केल्यामुळे गेली तीन वर्षे निवृत्त झालेले हजारो एसटी कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पेन्शन पासून वंचित आहेत. ही पेन्शन संबंधित लेखा विभागाने गिळंकृत केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

बरगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांची कर्मचारी पेन्शन योजना १५ नोव्हेंबर १९९५ पासून लागू करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकार निश्चित करेल ती रक्कम पेन्शन अंशदान म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा कपात करून ती कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे महामंडळ जमा करत असते. कर्मचाऱ्यांच्या अंशदानात रकमेत केंद्र सरकारने वेळोवेळी वाढ केलेली असून सध्या रुपये १,२५० एवढी रक्कम एसटी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा अंशदान स्वरूपात कपात करण्यात येत आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पेन्शनचे दावे संबंधित प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधि संगठन कार्यालयाकडे महामंडळाकडून पाठवले जातात व त्याची पडताळणी करुन संबंधित कार्यालय पेंशन पेमेंट ऑर्डर प्रसारित करत असते. महामंडळाच्या सर्वच विभागात किमान २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत पेन्शन सुरू करण्यात आली आहे याला अपवाद, मुंबई विभाग आहे, असे बरगे म्हणाले.

आयुक्त, प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संगठन, बांद्रा, मुंबई येथील डेक्स ७६ कडे मुंबई विभाग व मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांचे मिळून सन २०१७ पासून अद्यापपर्यंत सुमारे २,२५० कर्मचाऱ्यांचे पेन्शन दावे वेगवेगळ्या कारणांनी प्रलंबित आहेत अशी माहीती आहे. पैकी ४६५ कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू होण्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, बांद्रा कार्यालयात येराझार घालत आहेत. परंतू, कर्मचाऱ्यांना पेंशन पेमेंट ऑर्डर अद्यापही मिळालेले नाहीत, असे बरगे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -