Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनातं घट्ट करणारी, कॉफी

नातं घट्ट करणारी, कॉफी

सुनील सकपाळ-मनोरंजन 

अंगभूत गुणांची कदर आणि सुप्त गुणांची पारख झाली, तर कुणीही आपलासा होतो. लग्नानंतरचे बदललेले जीवन तसेच अनेकाविध भूमिका साकारताना स्वतःला विसरून गेलेल्या सौ. रेणू रणजित राजवाडे हिच्याबाबत असेच घडते. मुंबईत वास्तव्याला असलेल्या आणि व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर असलेल्या रेणूला गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलचे इंटिरिअर डिझाइनचे काम मिळते. या हॉटेल मालकांचा मुलगा रोहित सरपोतदार सध्या हॉटेलचे व्यवस्थापन पाहात असल्याने त्याच्याशी रेणूचा कामानिमित्त संबंध येतो. थोडासा अवखळ; परंतु मनाने निर्मळ असलेला रोहित हा रेणूच्या सालस स्वभावाकडे आकर्षित होतो. पुढे दोघांमध्ये मैत्री होते.

या सहवासादरम्यान पूर्वाश्रमीच्या रेणूला शोधण्याचा रोहितचा प्रयत्न सौ. रेणूला आवडतो. भूतकाळाला उजाळा मिळत असल्यामुळे रेणूही त्याला अधिकाधिक वेळ देते. विवाहित असल्याने रेणू तिच्या मर्यादा ओळखून असते. दोघांमधील अनामिक नात्याचीही तिला कल्पना असते. मात्र, रोहितची प्रत्येक मागणी ती पूर्ण करू शकत नाही. त्यातच एका प्रसंगानंतर पूर्वाश्रमीच्या रेणूवर सौ. रेणू अन्याय करते, असा रोहितचा समज होतो. रेणू विवाहित आहे आणि समजदारही आहे. त्यामुळे रणजितसह रोहित यांना त्यांच्या-त्यांच्या जागी ठेवून ती मध्यम मार्ग काढते.

‘कॉफी’ चित्रपट फ्लॅशबॅकने सुरू होत असल्याने एकेक गोष्ट हळूहळू उलगडत जाते. तसेच उत्सुकता वाढत जाते. प्रत्येक कथेचा शेवट असतो. कथा आणि पटकथाकारानेही तेच केले आहे. हा शेवट सर्वांना आवडावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
कॉफी ही थोडी गोड, थोडी कडवट असते. तशीच प्रेमकथा तुम्हाला अनुभवायला मिळेल. प्रेमाची अनुभूती झाल्यावर येणारी जवळीक, एकमेकांची ओढ, तासनतास चालणाऱ्या गप्पा आणि एकमेकांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रेमाची गोड बाजू मानली, तर द्विधा मन:स्थिती, छोट्या-मोठ्या कुरबुरी आणि प्रेमातील अडथळ्यांसारखी कडवट बाजूही अनुभवायला मिळते. अशा कारणांमुळे ‘काॅफी’ हा चित्रपट आजवरच्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळा वाटतो. ‘इट्स नाॅट अ लव्ह स्टोरी,… इट्स अ स्टोरी ऑफ लव्ह…’ असे या चित्रपटाचे वर्णन करणे योग्य ठरेल.

कायम उत्कंठा वाढवणारे कथानक ही ‘काॅफी’ चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. या सिनेमात कविमनाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या स्पृहा जोशी हिने मिसेस रेणू राजवाडे साकारली आहे. तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर (रोहित सरपोतदार) आणि कश्यप परुळेकर (रणजित राजवाडे) प्रमुख भूमिकेत आहेत. पिक्चरचे कथानक मिसेस रेणूवर आधारलेले असल्याने स्पृहाचा रोल महत्त्वाचा आहे. एका क्षणी स्वच्छंद, दुसऱ्या क्षणी गंभीर आणि जबाबदारीची जाणीव असलेली रेणू तिने चांगल्या प्रकारे साकारली आहे. सिद्धार्थ आणि कश्यप यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. चित्रपटात नेमकीच आणि परिस्थितीनुरूप गाणी असली तरी श्रवणीय आहेत.

‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘काॅफी’ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची आहे. मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्यासह संवादलेखनही केले आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत गीतलेखनदेखील केलेले असून, तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवलेला आहे.
मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या नव्या मराठी चित्रपटाच्या रूपाने सिनेरसिकांना नाते घट्ट करणाऱ्या ‘काॅफी’चा आस्वाद चाखण्याची संधी चालून आली आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -