Friday, June 20, 2025

रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करा

रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करा

  • नरेश कोळंबे


कर्जत : कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल भाग आहे तसेच २००१ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार शासन निर्णयानुसार शासनाने निर्धारित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा आणि मिनी माडा म्हणजेच टी एस पी या क्षेत्राकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष निधीची तरतूद केली जाते . परंतु रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रांमध्ये समाविष्ट नसलेल्या आदिवासी वाड्या - पाड्या यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारची विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली नाही . अश्या सर्व वाड्या आणि पाड्यांच्या विकासासाठी ह्या निधीची तरतूद करण्यात यावी यासाठी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने अलिबाग येथे आदिवासी विभागात निवेदन देण्यात आले .

ज्या आदिवासी वाड्या पाड्या आदिवासी उपयोजन, माडा, मिनी माडा या क्षेत्रात समाविष्ट आहेत, त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत विशेष निधीची तरतूद केली असतांना देखील जिल्हा नियोजन निधीचा देखील लाभ मिळतो. तर समाविष्ट नसलेल्या वाड्या पाड्या ह्या आजपर्यंत सार्वजनिक विकासापासून वंचित राहिल्या आहेत म्हणून एका जिल्ह्यामध्ये राहणारा आदिवासी समाज हा एकच आहे, त्या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ओ टी एस पी मध्ये असलेल्या वाड्यां पाड्या चा समावेश उपयोजने मध्ये करा नाही तर जिल्हा नियोजनना मार्फत विशेष राखीव निधीचा कोटा मिळाला पाहिजे तरच या आदिवासी वाड्या पाड्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. आदिवासी समाजातील विसंगती दूर केली तरच खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होण्यास मदत होईल.


म्हणूनच ह्या सर्वांना आदिवासी उपयोजने मध्ये सामील करा नाहीतर समाविष्ट नसलेल्या वाड्यांना व पाड्यांना जिल्हा नियोजनात विशेष राखीव निधीचा कोटा देण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी संघटनेच्या वतीने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आदिती ताई तटकरे, रायगड जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा नियोजन समिती , तसेच आदिवासी विकास प्रकल्प- पेण यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे , जिल्हा संघटनेचे सचिव हरेश वीर , खालापूर तालुका अध्यक्ष अंकुश वाघ, अलिबाग तालुका संघटनेचे सचिव श्री काशिनाथ दरवडा आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment