Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीबकरीचे शिर असलेल्या योगिनीची दगडी मूर्ती लंडन भारताला परत करणार

बकरीचे शिर असलेल्या योगिनीची दगडी मूर्ती लंडन भारताला परत करणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेली बकरीचे शिर असलेल्या योगिनीची दहाव्या शतकातील दगडी मूर्ती देशाला परत केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांनी केली आहे. ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणाले की, आपल्या देशाचा अधिकार असलेल्या कलाकृतींच्या प्रत्यावर्तनाची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.

यापूर्वी, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले होते की, वर्ष 1980 च्या सुमारास कधीतरी, उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेल्या 10 व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी मूर्तीची पुनर्प्राप्ती आणि परत आणण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगतांना मला आनंद होत आहे.

ही शिल्पाकृती म्हणजे बकरीचे शिर असलेल्या योगिनीचे शिल्प असून वालुकाश्मापासून घडविण्यात आलेल्या देवतांच्या दगडी मूर्तींच्या समूहाचा भाग असलेली ही मूर्ती लोखरी येथील मंदिरात बसविण्यात आली होती.

1988 साली ही मूर्ती लंडनच्या कला बाजारात काही काळ आढळली होती. 2021 सालच्या ऑक्टोबरमध्ये भारतीय उच्चायुक्तांना लंडनजवळच्या एका खासगी निवासस्थानाच्या उद्यानात लोखरी येथील मूर्तींच्या वर्णनाशी जुळणारी बकरीचे शिर असलेल्या योगिनीची दगडी मूर्ती सापडल्याची माहिती देण्यात आली.

योगिनी म्हणजे उपासनेच्या तांत्रिक पद्धतींशी संबंध असलेल्या शक्तिरूपी स्त्री देवतांचा गट असतो. त्या बहुतेकदा 64 योगिनी अशा सामूहिक स्वरुपात पुजल्या जातात आणि त्यांच्या ठायी अमर्याद शक्ती असल्याचा भाविकांना विश्वास असतो.

मकर संक्रांतीच्या मंगल दिनी भारतीय उच्चायुक्तांना ही शिल्पाकृती मिळाली असून त्यांनी ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठवून दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -