Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘जागते रहो’

‘जागते रहो’

कथा , डॉ. विजया वाड

चाळीमध्ये चोर! बापरे! श्रीमंत लोक ब्लॉकमध्ये राहतात. पण चोरांनी चाळ पसंत केली, तर वेणुताई ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून चोरांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. ‘चोर’ म्हणजे काय? चौर्य हेसुद्धा स्किल आहे, ज्यात धोका भरपूर अन् फायदा? अन् प्रेडिक्टेबल. मी चोरांना ‘माणूस’ समजते. या त्यांच्या वाक्याला टाळ्याच टाळ्या पडल्या होत्या. कोणीतरी आवडीने थोडाच चोर बनतो? नाइलाजाने ‘चोरी’ हा व्यवसाय पत्करतात. तसे लाच घेणारे, टेबलाखालून व्यवहार करणारे ‘चोर’ असतातच. पण ‘छुपे’ हो! वरून ‘साव’च असतात सारे!
वेणुताईंना ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून बोलावले, तेव्हा त्या हौसेने गेल्या. नावच होते ‘शर्विलक’…. शर्विलक उघडपणे अर्थाअर्थी चोर! पण जो शर्विलक ‘असून’ ‘नसल्यासारखा’ वागतो तो तर महाभयंकर चोर! हे वाक्य तर छप्पर फाडके ताली ले गये!
वेणुताई चोरांच्या कार्यक्रमाला जात आहेत हे काही मिस्टर वेणुगोपालांना आवडले नाही. “तू अतिच करतेस” हे त्यांनी म्हणून… बघितले. पण वेणुताई निश्चल होत्या. ‘चोर’ तरी बोलावतात मला. तुम्हाला तर बेगर्सही बोलवत नाहीत. वर हा टोमणा.वेणुगोपाल गप्प! पण चोरांना जेवण?
हे अतिच झालं! ना… वेणुगोपालांना खबर… ना मुला-बाळांना….
“ ‘चोर चोरी करणार’ हे गृहीत धरता तुम्ही!” त्यांना माणुसकी असते हे विसरता.” वेणुताई म्हणाल्या. घरातल्यांना पटण्याजोगे नव्हतेच हे वाक्य. पण वेणुताईंना कोण बोलणार?
‘करा काय करायचं ते!’ नवरोबा हताश… उदास… पण गप्प चुप्प!
असे चोर पंगतीला आले. “वेणुताई, तुम्हाला सांगतो… चोरांचं नीतिशास्त्र असतं. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. नो चोरी ‘त्या’ घरी!” वेणुताई निर्धास्त होत्या. तीन चोर जेवायला आले. चाळकरी शिस्तीत आपापला माल कडीकुलुपात घेऊन सज्ज होते. ‘चोर’ जेवणार अखेर. काही व्हायला, जायला नको.
या सुदेशराव, सुदर्शन, सुजय असे तीन ‘सुसु’चे सुंदर स्वागत रांगोळी काढून वेणुताईंनी केले. वेणुगोपाल घरी राहावेत म्हणून, तर वेणुताईंनी रविवार निवडला होता. जाम घाबरलेला नवरा बघून वेणुताईंना मौज वाटत होती.
“या या चोर साहेब”
“अहो वेणुताई, दादा, नाना, अप्पा असे म्हणा. बरे वाटते.” “या या दादा, नाना, अप्पा!”
“आता कसं?” चोर पांढरे शुभ्र कपडे, पेहराव घालून होते.
वरून अजिबात चोर वाटत नव्हते. असं तोंडावर चोर कोण वाटतं?
कोणीच नाही! खरं ना? “अजिबात घाबरू नका. मिठाला जागतो आम्ही.” “अगदी खरं. ज्याचे मीठ खावे त्याशी बेईमान ना व्हावे.” वेणुताई वदल्या. चोर ताटाभवती रांगोळी बघत जेवले. पोटभर अगदी! आशीर्वाद देत उठले. वेणुताई धन्य-धन्य झाल्या.
“उद्या वृत्तपत्रात बातमी देतो. तीन चोर जेवले वेणुताईंकडे.” वेणुगोपाल म्हणाले. चोरांनी नकार दिला. “त्यांनी आमची नावे उघड होतील,” तिघे एकसुरात म्हणाले. “आधी जेवले. मग जेल झाले. असे व्हायला नको.” सुदर्शन म्हणाला. दोघांनी त्यास दुजोरा दिला.
शेजारच्या खानसामे म्हणाल्या, वेणुताईंकडे आल्या, “ह्यांनी पानाचे तबक आणले का हो तुमच्याकडे?” …“छे बाई.” वेणुताईंचे प्रॉम्ट उत्तर. “जाम सापडत नाही. तुमच्याकडे चोर जेवल्यापास्नं.”
“चोरांचं नीतिशास्त्र असं कमकुवत समजता का तुम्ही?”
“चोरांना नीतिशास्त्र असतं?” खानसामे म्हणाल्या. यावर युद्ध व्हायचेच बाकी होते. दोघींचे नवरे मधे पडले. “मी तुला नवे तबक, पानाचे आणून देतो” पर्यंत मांडवली झाली. तेव्हा कुठे वाद मिटला.
“रेमंडचं वॉच सापडत नै” जोशी काकू कुरकुरल्या. झालं! पानाचं तबक गेलं, रेमंडचं वॉच गेलं. १ आणि २ हजारचा फटका. वेणुताईंच्या छातीत धडकी भरली. सायंकाळी शिवाजी पार्कवर गेल्या वेणुताई. पांढऱ्या कपड्यातले साव बरोब्बर हेरलेन त्यांनी.
“गेलात ते गेलात अन् वर चोरी केलीत? पानाचे तबक? चोरले… रेमंडचं रिस्टवॉच लंपास केलं!” “सॉरी वेणुताई.” “नो लॉरी टु कॅरी युवर सॉरी! आय अॅम सॅड व्हेरी व्हेरी!” “उद्या पानाचे तबक देतो. उद्या रिस्टवॉच घरी देतो मी.”
“उद्या? उद्या नको आज.” “आज? कसे शक्य आहे?” “का शक्य नाही?” “अहो, ते आम्ही विकले. विकणाऱ्याकडून परत तर आणायला हवे.” “लवकर आणा. मेरे इज्जतका सवाल है.” वेणुताई रडत म्हणाल्या. “जागते रहो. आजही लाते है!”
चोरांनी मनावर घेतले आणि सारे सामान आणून दिले. अगदी त्याच रात्री! “चोर आपल्या नीतीला जागले.” वेणुताई म्हणाल्या. यजमान बिचारे होतेच. प्रत्येक घरासारखे!
“आता ते ज्याचे त्याला परत कर.” यजमान म्हणाले अन् वेणुताईंनी तसे केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -