- दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आणि त्यांची ऐतिहासिक मानचिन्हे नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सध्या जोरदार चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुद्रा संस्कृत भाषेत निर्माण केली. शिवरायांचे पिताश्री शहाजीराजे यांची मुद्रा फार्सी भाषेत होती. शिवरायांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपल्या भाषेत घुसलेल्या परकीय शब्दांना बाजूला करून आपली भाषा शुद्ध करण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण करण्याची व्यवस्था केली.
अशाप्रकारे शिवरायांनी मुस्लीम आक्रमकांनी आपल्या देव, देश, भाषा आणि धर्म नष्ट करण्यासाठी केलेल्या अट्टाहासाला तोडीस तोड उत्तर देऊन आपला देव, देश, भाषा, संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठीच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राष्ट्र रक्षणासाठीच गडकिल्ले आणि जलदुर्ग उभारले. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय आक्रमकांच्या आरमाराला चोख उत्तर देण्यासाठी मराठ्यांचे आरमार उभे केले. हे मराठ्यांचे आरमार अत्यंत प्रबळ होते.
तिरुवन्नमलैला शंकराचे मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली होती. त्याच प्रमाणे समोत्तीर पेरुमलाचे म्हणजेच विष्णूचे मंदिर पाडून त्याची मशीद करण्यात आली होती. शिवरायांनी त्या मशिदी पाडून मंदिरे उभारली आणि त्या मंदिरात त्या त्या देवांची प्रतिष्ठापना केली.
आज शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर मुसलमान अतिक्रमण करून त्या किल्ल्यांचा ऐतिहासिक संदर्भ बदलण्याचा प्रयत्न अवैधपणे करत आहेत. अशा गोष्टींना सरकारने तत्काळ आळा घातला पाहिजे.
या देशाची ऐतिहासिक परंपरा नष्ट करण्याचा हा कुटील डाव आहे. या देशातली विजयाची परंपरा नष्ट करून देशातल्या नागरिकांमध्ये पराभूत मानसिकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीचे स्तोम माजले आहे. विशाळगडावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर लोहगडावर सुद्धा याचीच पुनरावृत्ती होत आहे.
मुसलमानांची ही कृती देशाच्या ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन त्यावर आधीच्या ऐतिहासिक खुणा पुसून टाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे देशातल्या ऐतिहासिक वास्तू भ्रष्ट करण्याचा प्रकार आहे.
ज्यांनी अशा प्रकारचे दुष्कृत्य केले आहे त्या सर्वांवर सरकारने तत्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि ऐतिहासिक वास्तूंचे त्यांच्या ऐतिहासिक परंपरा सह जतन करावे. त्याचप्रमाणे सर्व अवैध बांधकामे काढून टाकावीत.
सरकारने हे काम केले नाही तर या देशाची ऐतिहासिक संस्कृतिक आणि धार्मिक परंपरा नष्ट करण्याचा परवाना या समाजकंटकांना देण्यात आला आहे असा समज जनतेत पसरण्याचा धोका नाकारता येत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा प्रस्थापित केली. शिवराय हे या राष्ट्राचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या गड-किल्ल्यांवर निर्माण होणारे दर्गे शिवरायांच्या विजयाच्या परंपरेला अपशकुन करणारे आहेत. अशी भावना या देशातल्या तमाम शिवप्रेमी नागरिकांची आहे. शिवप्रेमी नागरिकांच्या या भावनेची होणारी अवहेलना थांबवावी. आणि शिवरायांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा प्राणपणाने जतन करावा. ही गोष्ट राष्ट्रहिताची आहे. राष्ट्रहिताला बगल देऊन केलेली प्रत्येक कृती राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाते. हा सिद्धांत सरकारने विस्मृतीत जाऊ देऊ नये एवढीच माफक अपेक्षा.