मृणालिनी कुलकर्णी
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! जानेवारी महिन्यातील गारवा, विज्ञानाच्या आधारे काळा रंग उष्णता शोषून घेतो. शरीर ऊबदार ठेवतो. म्हणून सर्व सण-उत्सवांत नाकारल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या वस्त्राला संक्रांतीत विशेष स्थान असते. हितसंबंध जोडण्यासाठी, नाती टिकविण्यासाठी, ओळख वाढविण्यासाठी आपण एकमेकांना तीळगूळ देतो. या वर्षी अनेक वर्षे मनात दडलेला काळा रंग, काळा-गोरा हा वर्णभेद नष्ट व्हावा, हा विचार तीळगुळासोबत शेअर करीत आहे.
लहान वयातच गोष्टीतील राणी, राजकन्या या गोऱ्यापान, दिसायला सुंदर, हुशार या उलट राक्षस, चेटकीण या काळ्या रंगाच्या, कुरूप, दुष्ट हेच ऐकत आलो. दिवा बंद झाला की, काळोख, अंधाराला मुले घाबरतात. म्हणून की काय, काळा रंग गूढ, नकारात्मकता हे डोक्यात बसले गेले. आज कपड्यातील तरी काळ्या रंगाने शुभ-अशुभची कल्पना मोडीत काढली आहे. पार्टीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. खरंच उठावदार, आकर्षक काळ्या रंगाचे सौंदर्य (ब्लॅक ब्युटी) वेगळेच झळाळते.
‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वाहिनी आण…’ सर्वांना नववधू गोरीच हवी. सौंदर्य काय फक्त गोरेपणावरच अवलंबून असते का? गोरा रंग म्हणजे सौंदर्य आता पुसले जात आहे. तरीही रंग चर्चिला जातोच. जागतिकीकरण, शिक्षणाचा प्रसार होऊनही बऱ्याच लोकांची सौंदर्याची व्याख्या खूपच लहान असते. बाह्य सौंदर्य आकर्षित करते. आतील सौंदर्य मोहविते. व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे आहेत. तरी पण विशेषतः लग्नात ती/तो गोरी आहे हे ठसविले जाते. रंगापेक्षा शरीराची ठेवण, फीगर्स त्याहीपेक्षा एखाद्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य हेच त्या मुला-मुलींचे सौंदर्य असते. प्रत्यक्षात मुलांना काळ्या-सावळ्या रंगाचे काहीच नसते, समाज त्यांना विचलित करतो.
काही वर्षांपूर्वी “डार्क इज ब्युटीफूल” हे अभियानात तरुणाईवर प्रचंड प्रभाव असणाऱ्यांनीच अशा गोऱ्या रंगाची भलावण केली, तर त्याचे किती वाईट परिणाम होतील, या विचाराने अभिनेता अभय देओल यांनी हिरो-हिरोइन्सच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर टीका केली होती.
बोल्ड अँड ब्युटीफूल नंदिता दास म्हणतात, सामान्य रूपात बुद्धिमतेचे तेज झळकत असेल, तर तिचे सौंदर्य तथाकथित सौंदर्यापेक्षा उठून दिसते. चित्रपटात माझा नो मेकअप असायचा. मला डस्की ब्युटी हे विशेषण चिकटले; परंतु माझ्या याही अनकन्व्हेक्शनल रूपाचा मला अभिमान आहे. धग चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी उषा जाधव यांना सुरुवातीला रंगामुळे रिजेक्शन मिळाले होते. आताचे तरुण दिग्दर्शक रंग या गोष्टीला महत्त्व देत नाहीत, असे त्या म्हणतात.
सुधा मूर्ती म्हणतात, ‘मुलाखतीच्या वेळी बाह्य सौंदर्यापेक्षा तुमचा बोलताना, वागतानाचा अप्रोच महत्त्वाचा असतो.’ आठवा, थ्री इडियट्समधील इंटरव्यू, स्वतःच्या मतावर ठाम राहून जॉबला नकार देणारा तरुण.
एका काळ्या युवतीची कथा :
समजायला लागल्यापासून मर्लिन जॉन्सन कोडेवाणी हिला सौंदर्याचा हव्यास होता. फॅशनची झगमगती दुनिया, सौंदर्यप्रसाधने, मासिकातल्या तरुणीची रंगरंगोटी, त्यांची तुकतुकीत कांती, पाहता ती स्वप्नाच्या दुनियेत पोहोचायची. तेच तिने स्वतःचे जागृत लक्ष्य केले. सौंदर्यप्रसाधन करणाऱ्या कंपन्या जाहिरातीसाठी काळ्या युवतीचा विचार करीत नसत. त्या काळात “सौंदर्याच्या दुनियेत माझ्यासारखी काळी युवती प्रवेश करेल आणि स्वतःचे नैसर्गिक प्रसाधन बाजारात आणेन,” ते मर्लिनने साध्य केले.
सौंदर्याचा प्रमुख निकष गोरेपणा हा काळा विचार जगभर आहे. नितळ त्वचा, निरोगी आरोग्य ही व्याख्या लोप पावत आहे. त्वचेमध्ये असणारं मेलॅनिन या द्रव्याचे प्रमाण आपल्या स्कीनचा रंग ठरवितो. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदींनी वर्णद्वेष मिटविण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले, शिक्षा भोगली. तरी आजही त्याचे पडसाद उमटत आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट या द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखातील भाग –
अँटिगाच्या इतिहासात २५० वर्षांपूर्वी किंग फोर्ड नावाच्या एका गुलामाचा गुलामगिरीचे साखळदंड तोडण्याचा प्रयत्न फसल्याने तो फासावर गेला. त्याच तुरुंगाच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यात व्हिव्हियन रिचर्ड्सचे बालपण गेले होते. त्याचे वडीलसुद्धा त्याच तुरुंगात नोकरीला होते. रिचर्ड्सवर याचा परिणाम झाला होता. गोऱ्या संघाविरुद्ध त्याची फलंदाजी सशस्त्र क्रांतीचा लढाच होता. त्याची बॅट त्याचे शस्त्र होते.
वांशिक आणि वर्णीय जाणीव विस्तारलेल्या जगात विश्वविख्यात फुटबॉलपटू पेले यांना ‘ब्लॅक प्लेअर्स’ संबोधणे योग्य आहे का? कशाला काळा मोती म्हणता? मोतीच म्हणा ना. जागतिक तापमान वाढीमुळे होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांमध्ये जगभरातला तळागाळातला समाज भरडला जातो. हे आता समोर आले आहे. अजूनही प्रश्न मिटला नाही.
मराठी साहित्यात एकनाथ यांचे समकालीन संत कवी विष्णुदास नामा यांची विलक्षण लय असलेली गवळण. काळ्या रंगाच्या अपूर्व सौंदर्यानं कृष्णमय होऊन केलेली रचना –
“रात्र काळी, घागर काळी।
यमुनाजळे ही काळी वो माय।।…”
शेवटी वि. स. खांडेकरांची ‘दोन ढग’ ही प्रतिकात्मक कथा : पांढरा ढग वेगावेगाने स्वर्गदारी पोहोचतो. पण त्याला दाराशीच थांबावे लागते, तर काळा ढग तापलेल्या पृथ्वीला पाणी देऊन उशिरा येऊनही त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो. ढगाप्रमाणे रिक्त, निर्धन अवस्था ही ऐश्वर्यमान माणसाचे प्रतीक आहे. अशीच माणसे समाजाला समृद्ध आणि संपन्न करतात. हेच ब्लॅक ब्युटीचे/काळ्या रंगाचे सौंदर्य होय.
[email protected]