Monday, September 15, 2025

बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात

बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात
बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे.  मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं आहे. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे. दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा आता पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र काल एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली.
विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले. जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.
Comments
Add Comment