केपटाऊन (वृत्तसंस्था):भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतील डीआरएस वादासाठी भारतीय संघावर कोणताही आरोप किंवा दंड लावण्यात आलेला नाही. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला असला तरी पाहुण्या क्रिकेटपटूंचे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे नाही, असे आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांना वाटते.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाच्या २१व्या षटकात रवीचंद्रन अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला मैदानी पंचांनी पायचीत घोषित केले. एल्गरने यावेळी डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्टंपवरून जात होता आणि या कारणास्तव मैदानावरील अंपायरला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. मैदानावरील अंपायर मॅराईस इरॅस्मस यांनाही चेंडू इतका उसळी घेईल, यावर विश्वास बसत नव्हता.
यानंतर भारताच्या क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करत होस्ट ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टला काही गोष्टी सांगितल्या. विराटही संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे, असे लोकेश राहुल म्हणाला.
भारताला केपटाऊन कसोटीत सात विकेटनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच पाहुण्यांनी मालिका १-२ अशी गमावली. परिणामी, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.