गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला आणि अधूनमधून पुढे येत असलेल्या एखाद्या भावनिक मुद्द्याला अचानक व्यापक स्वरूप देण्यात आले व त्याला राजाश्रय देऊन त्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न दिसू लागले म्हणजे महत्त्वाची निवडणूक तोंडावर आली, याची खूणगाठ बांधावी. आता हेच बघा, महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. याच मराठीच्या मुद्द्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता हवा दिली आहे आणि तो मुद्दा भावनिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारने विशेषत: शिवसेनेने चालविला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात येऊ घातलेल्या मुंबईसह अन्य प्रमुख महापालिकांच्या निवडणुका या होय. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासूचा हा मुद्दा महाआघाडी सरकारने नव्या अंदाजात पुढे आणला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा आदेश दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. मात्र या आदेशात केवळ नामफलक मराठी भाषेत असावा इतकाच उल्लेख नाही, तर अनेक महत्त्वाच्या अटींचा उल्लेख आहे. सरकारने दुकानदारांना यातून पळवाट काढता येऊ नये याची सर्व काळजी घेतलेली दिसत आहे. आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे इंग्रजी किंवा इतर भाषेत मोठे नाव आणि कोपऱ्यात छोट्या आकारात मराठी नाव असे आता चालणार नाही. मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार हा इतर भाषांतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खरं म्हणजे प्रारंभी मराठी भाषा, मराठी माणूस याच मुद्द्यांवरून रण पेटवून आणि आंदोलने करून शिवसेना नावारूपास आली. मराठी भाषा आणि मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जन्माला आलेला शिवसेना पक्ष याच मराठी बाण्याच्या आधारे मुंबई महापालिकेत सत्तेवर आला आणि गेली २५ वर्षे या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेची सत्ता उपभोगत आहे. तसेच राज्यातही या आधी युतीचे सरकार म्हणून व आता महाविकास आघाडीचे सरकार म्हणून शिवसेना सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत राहून या पक्षाला मराठी बाण्याचा विसर पडला, असे कसे म्हणता येईल? तसेच दुकानांच्या मराठी पाट्यांच्या याच मुद्द्यावर सुमारे दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यात मराठी पाट्यांचा कायदा करण्यात आला; परंतु काही दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी किंवा ज्यांना मराठीचे वावडे आहे अशांनी त्यात पळवाटा काढत मराठी नावे नामफलकावर एका कोपऱ्यात लिहून थोडक्यात वेळ मारून नेली होती.
आता आघाडी सरकारने कुणालाही पळवाटा काढता येणार नाही, असे बदल नियमांमध्ये केले आहेत. तरीही आता या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवादावरून वादंग सुरू झाला आहे, तर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहिताना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे, असे शहा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहजिकच मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यातील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेने ‘खळ्ळखट्याक’चा इशारा दिला आहे.
पाटी बदलायची की दुकानांच्या काचा, हे तुम्हीच ठरवा; अशा शब्दांत मनसेने इशारा दिला आहे. त्यामुळे दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्यांविरोधात मनसेकडून पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून विरोध करणाऱ्यांना इशारा दिला होता. महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुंबईत शिवसैनिकही आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना यासंबंधी सूचना द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात शिवसैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आली. या माध्यमातून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण व्यापाऱ्यांना करून देण्यात आली.
आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्येही शिवसेना असाच उपक्रम राबवणार का, हे पाहावे लागेल. शिवसेना बऱ्याच दिवसांनी मराठीच्या मुद्द्यावरून अशा प्रकारे रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात आता मराठी पाट्यांवरून राजकारण पेटणार असेच दिसत आहे. म्हणजेच पालिका निवडणुकांवर डोळा ठेवून हे नवे नियम करण्यात आले असून मराठी पाट्या ही निव्वळ धूळफेक आहे, हे सांगण्यास कुणा ज्योतिषाची गरज नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…