होबार्ट (वृत्तसंस्था): कर्णधार पॅट कमिन्ससह (४ विकेट) मिचेल स्टार्क (३ विकेट) या वेगवान दुकलीच्या अचूक आणि प्रभावी माऱ्याच्या जोरावर अॅशेस क्रिकेट कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंडला १८८ धावांत रोखताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी घेतली. त्याआधी ६ बाद २४१ धावांवरून पुढे खेळताना यजमानांनी फर्स्ट इनिंगमध्ये ३०३ धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव जवळपास पावणेदोन सत्र चालला. इंग्लंडला ४७.४ षटकांत ११८ जमवता आल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला पन्नाशी गाठता आली नाही. सर्वाधिक ३६ धावा आठव्या क्रमांकावरील ख्रिस वोक्सच्या आहेत. त्यानंतर कर्णधार ज्यो रूटने फलंदाजी केली. त्याने ३४ धावा केल्या. इंग्लिश संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर रॉरी बर्न्स चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. तो खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर दुसरा सलामीवीर झॅक क्रावलीला (१८ धावा) पॅट कमिन्सने माघारी धाडले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील अनुक्रमे डॅविन मॅलन (२५ धावा) आणि ज्यो रूटने (३४ धावा) थोडा प्रतिकार केला. मात्र, त्यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.
मॅलन आणि रूट बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्कने मधली फळी मोडीत काढली. मात्र, वोक्ससह (३६ धावा) सॅम बिलिंग्ज (२९ धावा) आणि मार्क वुडने (१६ धावा) छोटेखानी परंतु, महत्त्वपूर्ण खेळी करताना इंग्लंडला दोनशेच्या घरात नेले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्ससह (४५-४) मिचेल स्टार्कने (५३-३) प्रभावी गोलंदाजी केली. स्कॉट बोलँड आणि कॅमेरॉन ग्रीनला प्रत्येकी १ विकेट मिळाली.
वॉर्नर सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद पहिल्या डावातील आघाडीचा ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकला नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या डावातही भोपळा फोडू शकला नाही. त्यानंतर वनडाऊन मॅर्नस लॅबुशेन (५ धावा) परतल्याने दुसऱ्या डावात यजमानांची अवस्था २ बाद ८ धावा अशी झाली.