
मुंबई: भविष्यात डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्ही व्हेरियंटसोबत आपल्याला जगावे लागणार आहे. त्यासोबत दोन्ही व्हेरियंट एकाच वेळी संक्रमित (को-सर्क्युलेट) होत राहण्याचा धोका आहे. मात्र, लहान मुलांचे लसीकरण, सेम शॉट बूस्टर डोसेस आणि आरटी-पीसीआर चाचण्या हे घटक अत्यंत महत्त्वाचे राहतील, असे प्रतिपादन, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनेलच्या ‘व्हेरियंट्स, वॅक्सिन्स अँड अस’ या चर्चेदरम्यान, व्हायरोलॉजिस्ट आणि आरोग्यतज्ज्ञांनी केले.
आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी संचालक तसेच वेल्लोर येथील सीएमसीमधील क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागांचे माजी प्रमुख तसेच निवृत्त प्राध्यापक डॉ. टी. जेकब जॉन यांनी मुलांचे लसीकरण तातडीने करण्यावर भर दिला. यामुळे विषाणूचे संक्रमण आणि म्युटेशन्सद्वारे होणारा नवीन व्हेरीएंट्सचा उदय किमान स्तरावर राखता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.