Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमहिलांची पाण्यासाठी वणवण

महिलांची पाण्यासाठी वणवण

जव्हार हुंबरन गावातील वास्तव

जव्हार ग्रामीण (वार्ताहर) :देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी जव्हारच्या ग्रामीण आदिवासी भागात पाणीपुरवठ्याच्या मुलभूत सुविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. जव्हार तालुक्याच्या पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीतील अतिदुर्गम भाग असलेल्या हुंबरण येथे याचे विदारक वास्तव पाहायला मिळते. हुंबरण गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी दीड किलोमीटर पायपीट करून, डोंगर चढउतार करून पाणी आणावे लागत आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींचा पाण्यासाठीची वणवण आजही सुरूच आहे. गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पण या अधिकाऱ्यांनी त्याची दखलच कधी घेतली नाही. यापार्श्वभूमीवर जव्हार बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी हुंबरण गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, उपाध्यक्ष अनंता धनगरे, मोहन हिरकुडा, युवा उपाध्यक्ष गणपत भेसकर, कासटवाडी गटाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश घेगड, साकुर ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील वळवी, हेमंत गिरांधले, मंदार खिरारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 पाण्यासाठी वणवण- सरीता सीताराम रावते, हुंबरण

गावात पाणी नसल्याने या खड्यातून डोंगर चढून पाणी न्यावे लागते. आम्हाला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे.

७५ वर्षांपासून हीच परिस्थिती – गणपत भेसकर, ग्रामपंचायत माजी सदस्य, पिंपळशेत खरोंडा

गेल्या ७५ वर्षांपासून हीच परिस्थिती आम्ही भोगतो आहे. दीड किलोमीटर डोंगर चढून पाणी न्यावे लागते. प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने गेल्या वर्षी एक महिला डिलिव्हरीसाठी नेताना दगावली होती.

 पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा  -एकनाथ दरोडा, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, जव्हार तालुका

गावात पाण्याची आणि रस्त्याची दुरवस्था आहे. तरी जलजीवन मिशनअंतर्गत हुंबरण गावात पाणीपुरवठा योजना मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -