तलासरी (वार्ताहर) :राज्यात कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने नवीन निर्बंध घेतले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात नियमावलीचे काटेकोर पालन व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खुद्द तलासरी तहसीलदार श्रीधर गल्लीपिल्ले हे या नियमांच्या अमंलबजावणीसाठी रस्त्यावर उतरले असून बाजारपेठेतील आस्थापने, सलून, मॉल, किराणा दुकाने इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क न वापरणाऱ्यांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोनाविषयक निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यासाठी तहीसलदार स्वतः अॅक्शन मोडमध्ये दिसले.
तहसीलदार गल्लीपिल्ले महसूल कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लाऊड स्पीकरच्या सहाय्याने सामाजिक अंतर व चेहऱ्यावर मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येऊन कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी िदला आहे. संपूर्ण बाजारपेठेत गाव-पाड्यातून नागरिक बाजारपेठेत येत असतात. नागरिकांमध्ये ओमायक्रॉन व कोरोनाविषयी जागृती निर्माण करण्याकरिता तहसीलदारांंच्या आदेशाने बाजारपेठेमध्ये जागोजागी लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील खासगी दवाखाने, रुग्णालये या ठिकाणी अँटिजेन टेस्ट किटचे वाटप करण्यात आले.
खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती आरोग्य विभागास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण खासगी डॉक्टर पैशाच्या लोभासाठी थंडी-ताप-खोकल्याच्या आजारावर मनमानी उपचार करीत असून आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नगरपंचायत हद्दीतील आठवडी बाजारात सोमवारी तोबा गर्दी असते. हे ध्यानी घेऊन आठवडी बाजारातील फेरीवाल्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तथापि, आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे, परिणामी हा आठवडी बाजार बंद ठेवण्याची कार्यवाही तहसीलदारांनी सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमांच्या काटेकोर अंमलबाजवणीसाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पोलीस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे; परंतु पोलीस कर्मचारी इतर कामात व्यग्र असल्याने तहसीलदारांना म्हणावे तितके सहकार्य मिळत नाही. परिणामी लोकांना अद्याप वचक बसलेला नाही.