Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेवीटभट्टीमुळे अनेक कुटुंबांना मिळत आहे रोजगार

वीटभट्टीमुळे अनेक कुटुंबांना मिळत आहे रोजगार

शाश्वत रोजगाराचा चांगला पर्याय

पारस सहाणे

जव्हार :जव्हार तालुका हा अतिदुर्गम आणि डोंगर-दऱ्यांचा भाग आहे. येथे प्रचंड पाऊस पडतो, परंतु पाणी साठवणुकीसाठी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवतेच, शिवाय आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याबाबतीत तालुकावासीय खूप मागे आहेत. सध्या स्थानिक आदिवासी कुटुंबांना वीटभट्टीवर रोजगार उपलब्ध झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे.

तालुक्यात आजही भूमीहीन ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. काही शेतकरी पारंपरिक शेतीवर आपला चरितार्थ चालवत आहेत. तथापि, पारंपरिक शेती असल्याने ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांचे उत्पन्न हे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उरलेले ८ महिने आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नाही. तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायत व दोन ग्राममंडळ आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत भागात वीटभट्टी सुरू असल्याचे चित्र देखील आहे. गावातील अनेक कुटुंबांना वीटभट्टीवर काम मिळाल्याने गावातच रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

प्रत्येक कुटुंबाला पक्के घर आणि प्रत्येक घरी वीज व पाण्याची मूलभूत सोय उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून दारिद्र्य रेषखालील प्रत्येक गरजू आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या इतर योजनेतून घरकुल देण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाकडे पक्के घर असणार आहे. घर म्हटले की, महत्त्वाचा घटक म्हणजे विटा आहेत आणि विटांची गरज प्रत्येक बांधकामाला लागणार असल्याने बेटांची मागणी वाढतच राहणार आहे.

अनेक कुटुंबांनी विटनिर्मिती करून आपल्या घराचे बांधकाम करण्यास पुढाकार घेऊन करून बचत करण्याचा मार्ग सुद्धा शोधला आहे. एखाद्या कुटुंबाला ८ हजार विटांची गरज असेल तर तो एकूण बारा ते पंधरा हजार विटांची भट्टी तयार करतो त्यातून उरलेल्या विटांची विक्री करून घरासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करतो.

तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय सुरू झाल्याने कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. काही कुटुंबांनी तर स्वतः वीटभट्टी तयार करून त्यातून रोजगार उपलब्ध केला. शिवाय, स्वतःला आवश्यक नसलेल्या विटा विकल्या.
– सोनू खुताडे, वीटभट्टी व्यावसायिक

पंचायत समितीकडून घरकुल मिळाल्यानंतर विटांचा भाव काढल्यानंतर सहा रुपये प्रति नग आहे. मात्र, विटांचा खर्च जास्त वाढल्याने स्वतः वीटभट्टी तयार करून बाकी विटा विकल्या आणि त्या पैशातून दोन खोल्यांचे घर बांधले.
– राजाराम कोरडा, रहिवासी नांगरमोडा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -