Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाभारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

आयसीसी १९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकप

प्रोव्हिडन्स (वृत्तसंस्था):वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत शनिवारी (१५ जानेवारी) भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे.

आशिया चषकातील विक्रमी आठव्या जेतेपदानंतर भारताच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा यश धूल आणि सहकाऱ्यांना वर्ल्डकपमध्ये होईल. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने अपेक्षित सराव करता आलेला नाही. तरीही सराव सामन्यात यजमान वेस्ट इंडिजसह ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवत कॅरेबियन्स बेटांवरील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सातत्य संपूर्ण स्पर्धेत अपेक्षित आहे.

उभय संघांमधील मागील पाच सामन्यांचा निकाल पाहता भारताने ४-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यात मागील दोन सलग विजयांचा समावेश आहे. वैयक्तिक कामगिरीचा विचार करता कर्णधार धूलसह उपकर्णधार शेख रशीद, हारून सिंग, आराध्य यादव, दिनेश बाना, अनिश्वर गौतम, राज्यवर्धन हंगरगेकर, मानव पारख आणि व्हिकी ओसवालवर फलंदाजीची धुरा आहे. अंगरिक्ष रघुवंशी, रवी कुमार, गर्व संगवान, सिद्धार्थ यादव, निशांत संधू, कौशल तांबे आणि वासू वत्सवर गोलंदाजीची भिस्त आहे. दक्षिण आफ्रिकेकडे कर्णधार जॉर्ज वॅन हरदीनसह मॅथ्यू बोस्ट, डेवाल्ड ब्रेव्हिस, जेड स्मिथ, कॅडेन सोलोमन असे अनेक चांगले क्रिकेटपटू आहे.

माजी कसोटीपटू ऋषिकेश कानिटकर हे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक क्रिकेटपटूचा आदर राखला जाईल. तसेच प्रत्येकाला संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कानिटकर यांनी म्हटले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना एकत्रित राहण्याची आणि खेळण्याची संधी मिळाली. हा अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
वेळ : सायं. ६.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -