Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

सेनेला निवडणुकीत फटका बसणार

सेनेला निवडणुकीत फटका बसणार पालघर (प्रतिनिधी) : वसई येथे एका हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्या लावण्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसेल, असे भाकीतही त्यांनी केले. माध्यमाशी बोलताना सेनेने राज्यात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावर मराठी भाषेच्या पाट्या लावण्याच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठी पाट्यांसोबत हिंदी व इंग्लिश भाषांतील पाट्याही लागल्या पाहिजेत. शिवसेना जर केवळ मराठी पाटीचा आग्रह धरत असेल तर त्यांना येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला होता, त्यावर शिवसेनेने कुरघोडी केली, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आठवले यांनी हा मुद्दा राज ठाकरे यांचाच आहे, पण सेनेने तो आपल्या हाती घेतला आणि त्याबाबतचा आता त्यांनी कायदा केला. पण रिपाइंचा त्यास विरोध आहे. आगामी निवडणूक भाजप व आम्ही एकत्र लढवणार असून या निवडणुकीत सेनेचा पराभव अटळ आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment