खालापूर (प्रतिनिधी) : खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ची निवडणूक १८ जानेवारी रोजी होत असून या एका वाॅर्डात शेतकरी कामगारपक्ष व शिवसेना यांच्यात लढत होत असून, शेकापचे उमेदवार भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे प्रभागात बोलले जात आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या एका वाॅर्डात ही निवडणूक होत असून या प्रभागामधून शेतकरी कामगार पक्षाचे भाई संतोष जंगम व शिवसेनेचे मारुती पवार यांच्यात लढत होत आहे, या प्रभागावर संतोष जंगम यांचा नेहमीच वाढता प्रभाव राहिला आहे. येथील कोणत्याही कार्यक्रमात संतोष जंगम यांचा पुढाकार नेहमीच येथे राहिला आहे. लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही काम असो संतोष जंगम हे मदतीला पुढेच सरसावताना दिसतात. त्यामुळे येथील जनतेच्या मनात जंगम यांच्याबद्दल वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे संतोष जंगम यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे वाॅर्डात बोलले जात आहे.
मारुती पवार हे शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन जरी लढत असले तरी सेनेचा प्रभाव या प्रभागात कमी असल्याने सेनेला या वाॅर्डात धोका निर्माण होऊ शकतो. गेली दहा वर्षे जंगम या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत.सेनेकडून मंदा भोसले यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र छाननीच्या दिवशी त्यांचा अर्जच बाद झाल्याने मंदा भोसले यांच्या रूपाने जे सेनेकडून तगडे आव्ाहन होते ते संपुष्टातआले आहे.