Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीठाकरे साहेब, स्वेच्छामरण द्या...

ठाकरे साहेब, स्वेच्छामरण द्या…

दापोलीतील बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची विनंती

रत्नागिरी (प्रतिनिधी): एसटी महामंडळाचे सरकारी यंत्रणांमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एसटी संप (दुखवटा) सुरूच ठेवला आहे. तर दुसरीकडे, संपात सहभागी झालेल्या आणि वारंवार सरकार, महामंडळाने कामावर परतण्याचे आवाहन करूनही मागे न हटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची अथवा निलंबनाची कारवाई केली जात आहे. त्यातूनच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

आता या बडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दापोली एसटी आगारातील ६० कर्मचाऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या निवेदनाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची मागणी केली आहे. या ६० कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामुळे खळबळ उडाली आहे. ४१ टक्के पगारवाढ ही निव्वळ फसवी घोषणा असून, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग आणि एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असेही त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.


गेल्या ६८ दिवसांपासून आम्ही शांतपणे दुखवटा पाळत आहोत. प्रशासन मात्र कारवाई करत आहे. काही अधिकारी तर कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन दबाव टाकत आहेत. कामावर आले नाहीत तर, नोकरी जाऊ शकते, अशी भीती ते कुटुंबीयांना दाखवत आहेत. या प्रकाराकडे सरकारने लक्ष द्यावे. आम्ही आता स्वेच्छामरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागितली आहे. सध्या दिला जाणारा पगार पुरत नाही. जगण्यापेक्षा मेलेले बरे, अशी प्रतिक्रिया दापोली आगारातील बडतर्फ कर्मचारी मुनाफ राजापकर यांनी व्यक्त केली.


एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी अद्याप ठाम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झालेले आहे. मात्र, संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा रूजू व्हावे असे आवाहन महामंडळाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, काही कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबित आणि सेवेतून बडतर्फ केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आता या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे. काही अधिकारी आमच्या घरी येऊन दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -