नरेश कोळंबे
कर्जत : आता सर्वच ठिकाणी कोरोनाने हाहाकार माजविला असून अनेक लोक पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तपासणी आणि कोरोना टेस्ट करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. गाव – खेड्यांत अनेक वृद्ध स्त्री आणि पुरुष कधीही आजारपणाची तपासणी करून घेत नाहीत. अशा सर्वांना घरपोच सर्व सोय व्हावी यासाठी समतावादी प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ अंजप यांच्या वतीने रायगड हॉस्पिटलमधील तज्ज्ञांना घेऊन गावातील व शेजारील गावांतील लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवले होते.
समतावादी प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ अंजप आणि रायगड हॉस्पिटल यांच्या वतीने स्व. भास्कर मिणमिणे यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात लहान बाळांची तपासणी, ईसीजी, ब्लड प्रेशर, मधुमेह, स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, सर्व बॉडी चेकअप करण्यात आले. तसेच अत्यंत अल्प दरात महिला आणि पुरुष यांची सोनोग्राफी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.
सोनोग्राफीसाठी बाहेरील खासगी रुग्णालयापेक्षा निम्म्यापेक्षा कमी पैसे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रोशन साळोखे यांनी सर्व लोकांना मोफत औषध वाटप केले. या सर्व आरोग्य शिबिरात गावातील तरुणांनी विशेष भाग घेत अनमोल साथ दिली. त्यात तानाजी मिणमिणे, नरेश मिणमिणे, गुरुनाथ मिणमिणे यांनी हे शिबीर यशस्वी केले. यावेळी १०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भालचंद्र थोरवे, अभिजित देशमुख, बाजीराव दळवी, रामचंद्र मिणमिणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.