नाशिक (प्रतिनिधी) : नायलॉन मांजा विक्रीस बंदी असताना तो मांजा विकणाऱ्या दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार पेठ येथील गंगावाडी येथे शरद सुभाष ठाकूर (वय ३७) यांच्या दुकानात मनाई आदेश असतानाही नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने गंगावाडीत छापा टाकून ठाकूर यांच्या ताब्यातून साडेसहा हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे सहा गट्टू जप्त करण्यात आले. तसेच अशोकस्तंभ परिसरात जानकी अपार्टमेंटमध्ये अविनाश देवीदास गांगुर्डे हा युवक नायलॉन मांजा विकत असताना सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने त्याच्या दुकानावर छापा टाकला.
या कारवाईत २४ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ४० नग गट्टू जप्त करण्यात आले. या प्रकरणी अनुक्रमे पोलीस शिपाई विष्णू खाडे, पोलीस शिपाई राम बर्डे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात शरद ठाकूर आणि अविनाश गांगुर्डे यांच्याविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.