नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एकीकडे उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश इथे मकर संक्रांतीनिमित्त होणारे स्नान बंद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मात्र माघ मेळा भरला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त हरिद्वार आणि ऋषिकेश याठिकाणी हजारो भाविक स्नानासाठी येत असतात पण वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता स्नान करण्यास बंदी घातली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये माघ मेळा भरला आहे. तिथे मात्र लोकांना स्नानासाठी परवानगी आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माघ मेळ्यामध्ये आत्तापर्यंत ७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये देखील गंगासागर मेळा होत आहे. तिथेही लाखो भाविक जमा झाले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, उत्तराखंड सरकारने खबरदारी घेतली आहे. कुंभ मेळ्यात झालेल्या कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने मकर संक्रांतीच्या सणाला हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगेत स्नान करण्यास बंदी घातली आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने, हरिद्वारमधील हर की पौरी, ऋषिकेशमधील त्रिवेणी आणि इतर गंगा घाटांवर भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तरायणात सूर्याच्या प्रवेशानंतर साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हरिद्वार आणि ऋषिकेश येथे येतात.
सरकारने कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याची आम्ही अंमलबजावणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून आंघोळीसाठी येणाऱ्या भाविकांना परत पाठवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ओडिसातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य सरकारने मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या निमित्ताने धार्मिक मेळाव्यांवर बंदी घातली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार मकर संक्रांत आणि पोंगल या दिवशी मेळावे आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यात नदीकाठ, घाट, तलाव, समुद्रकिनारे आणि इतर जलकुंभांजवळ स्नान करण्यास बंदी असणार आहे.
हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याप्रमाणे लाखो लोक या मेळ्याला भेट देत असतात. हा मेळा संसर्ग पसरवण्याचे केंद्र बनू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळा नक्कीच एक सुपर स्प्रेडर ठरणार असल्याची भिती देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.