Monday, October 27, 2025
Happy Diwali

त्यांना मिळाले अकलेचे धडे

त्यांना मिळाले अकलेचे धडे

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात सुरू झालेला कलगीतुरा अद्याप संपलेला दिसत नाही. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यासंदर्भात येथील पत्रकार परिषदेत सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ‘११-७ ने आपण त्यांचा पराभव केला आहे. जिल्ह्यात मोठमोठे लोक आले होते. फार काही बोलले. हे लोक अक्कल सांगायला येथे आले होते. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील’, असे राणे म्हणाले. राणेंचा इशारा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँक चालवायला अक्कल लागते असे म्हटले होते. त्यावर नारायण राणेंनी अजित पवारांवर पलटवार देखील केला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राणेंनी निवडून आलेले मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचे अभिनंदन करतानाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली. दरम्यान गद्दारीचा वारसा असलेल्या लोकांच्या ताब्यात असताना बँकेची बदनामी झाली. मात्र आता नवा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या ताब्यात बँक सुरक्षित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राणे पुढे म्हणाले, ‘आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहे त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो. आतापर्यंत फक्त दोन ते तीन वेळा मी बँकेत आलो आहे’. यावेळी त्यांनी बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता टीका केली. त्यांचा वारसा गद्दारीचा आहे, अशा लोकांना आपण पळवून लावले आहे. त्यामुळे आता लपूनछपून फिरण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तो एक अपशकून होता, असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

अक्कल असणाऱ्यांच्याच हाती बँक...

राणे पुढे म्हणाले की,‘अर्थखात्याचे मंत्री येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून परत जातात. त्याला अक्कल म्हणतात. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे’, असे राणे म्हणाले होते. त्याच संदर्भात त्यांनी आज देखील अकलेच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >