Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पश्चिम उपनगरातील पुलांची पालिका करणार पुनर्बांधणी

पश्चिम उपनगरातील पुलांची पालिका करणार पुनर्बांधणी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेकडून अनेक वर्षे रखडलेली कामे हाती घेण्यात येत असून मुंबईतील अनेक भागांमधील रखडलेली पादचारी पुलांची बांधकामे देखील हाती घेण्यात येत आहेत. दरम्यान पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि बोरीवलीमधील मोडकळीस आलेल्या पादचारी पुलांच्या जागेवर पुनर्बांधणी करणे तसेच दहिसरमध्येही एका पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या तिन्ही पादचारी पुलांसाठी पालिका सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे कांदरपाडा येथे दहिसर नदीवर ६० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा प्रकारे नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. बोरीवली व कांदिवली येथे पादचारी पुलाची पुनर्बांधणी तर बोरीवली पूर्व येथील रतननगर पादचारी हे पूल मोडकळीस आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. हा पादचारी पूल रतननगर पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे या पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे १०० मीटर लांब व ३ मीटर रुंद असा हा पादचारी पूल आहे. कांदिवली पश्चिम येथील जोगेळेकर नाल्यावरील अस्तित्वात असलेले पादचारी पूल मोडकळीस आल्याने ते पाडण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेवर १० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा प्रकारे उंची वाढवून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांच्या बांधकामासाठी विविध करांसह ४ कोटी ५२ लाख ५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

Comments
Add Comment