Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

वर्ध्याच्या रुग्णालयात ११ अर्भकांच्या कवट्या, ५२ हाडे आढळल्याने खळबळ

वर्ध्याच्या रुग्णालयात ११ अर्भकांच्या कवट्या, ५२ हाडे आढळल्याने खळबळ
वर्धा : जिल्ह्यात आर्वी येथील कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. याप्रकरणी आरोपी डॉ. रेखा कदम हिला अटक केली आहे. तसेच डॉ. कदम यांच्या सासूलाही ताब्यात घेतले आहे.

आर्वीतील डॉ. रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये ४ दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह तिघांना अटक केली. बुधवारी पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. त्यावेळी रूग्णालयाच्या परिसरात एका खड्डयात ११ कवटया आणि ५२ हाडे आढळून आली. पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेऊन नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत?

कवट्या आणि हाडे नेमकी कुणाची आहेत याबद्दल पोलीस तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकांची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत.आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळुंके म्हणाले की, सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल.

Comments
Add Comment