खडा आवाज हरपला

  113

अजित कडकडे, प्रख्यात गायक


रामदास कामत यांच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी आहे. अत्यंत भरीव कारकीर्द घडवणारा हा माणूस अनेक अवीट गाण्यांच्या रूपानं काळावर आपला ठसा उमटवून गेला आहे. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक मराठी मन हळहळत असेल, यात शंका नाही.
मी अभिषेकीबुवांकडे शिकायला आलो, तेव्हा या क्षेत्रात अगदीच नवीन होतो. माझ्यासाठी मुंबई पूर्णपणे अनोळखी होती. त्यावेळी शिवाजी मंदिरला ‘मानापमान’चा प्रयोग लागला होता. ‘शिवाजी मंदिर’ अभिषेकीबुवांच्या निवासस्थानाजवळच होतं. एके दिवस सकाळी बुवा मला म्हणाले, ‘जा आणि ‘मानापमान’ बघून ये. त्यातले रामदास कामत नावाचे गायक इतके छान गातात की, त्यांना ऐकूनही तुला बरंच काही शिकायला मिळेल. ते कसा सूर लावतात, रंगभूमीवर सूर किती खडा लावावा लागतो, स्टेजवर कसं गायचं असतं, हे तुला त्यांना ऐकल्यानंतर समजेल.’ बुवांनी सांगितल्यानुसार मी चालतच शिवाजी मंदिरला गेलो. ‘तिकीट काढू नकोस, माझं नाव सांग,’ असं बुवांनी सांगून ठेवलेलं असल्यामुळे त्यांचं नाव सांगताच डोअर किपरनं मला आत सोडलं. मी सर्वात मागच्या रांगेतल्या खुर्चीवर बसलो. प्रयोग सुरू झाल्यानंतर रामदासजींनी ‘माता दिसली...’ म्हणायला सुरुवात केली आणि त्या ‘माता...’लाच असा काही सूर लावला की, रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. पुढचं गाणं अद्याप सुरूही झालं नव्हतं, पण पुढची काही मिनिटं कडकडाट सुरूच होता. त्या एक-दोन मिनिटांमध्येच मला स्टेजवरचा खडा सूर काय असतो, हे समजलं. त्या दिवशी ते नाटकातली सगळी गाणी एका मागाेमाग एक असे काही गायले की, उपस्थित सगळेच तृप्त झाले. तो विलक्षण आनंद घेऊनच मी परतलो.

पुढे पुढे ऐकत गेलो, तसं त्यांचं गाणं मला विलक्षण आवडू लागलं. नंतर आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या, ओळख वाढू लागली. कधी ते मला फोन करायचे, तर कधी मी त्यांना फोन करायचो. भेट झाली की, ते मला अभिषेकीबुवांच्या आठवणी सांगायचे. तालमीच्या वेळी त्यांनी पटकन एखादी चाल कशी बदलली, चालीचा ताल अचानक कसा बदलला, ‘इथे झपताल नको, तर रूपक ठेवू या’ असं त्यांनी कसं सांगितलं, त्यांना एखादी चाल कशी सुचली, हे ते भरभरून सांगत असत. अभिषेकींबुवांबद्दल बोलताना मधेच ते ‘तो काय माणूस होता...’ असं म्हणत तेव्हा त्यांच्या मनात बुवांबद्दल परकोटीचं कौतुक ओथंबलेलं दिसत असे. मी हार्मोनियम घेऊन बसलो तरी, कधी कधी तीन-तीन दिवस मला दोन ओळीही सुचत नाहीत; पण अभिषेकी यायचे आणि एखाद्याला ऑर्गनवर बसायला सांगून बघता बघता चाल लावून जायचे, अशा आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून येत असे. खरं तर, कलाकार स्वत:संबंधीच्या अशा गोष्टी सांगताना कचरतात. दोन-तीन दिवस चाल न सुचणं म्हणजे आपला कमीपणा समजला जाण्याचा धोका असल्यानं ते सूज्ञपण याचा उल्लेख टाळतात. पण रामदासजी कलाकाराबरोबरच माणूस म्हणूनही खूप मोठे होते. त्यामुळेच दुसऱ्या कलाकाराविषयी भरभरून बोलताना त्यांनी कधीही मागे-पुढे पाहिलं नाही.

केवळ अभिषेकीबुवाचं नव्हे, तर मी त्यांना कधीच कोणत्याही गायकाबद्दल, कलाकाराबद्दल वाईट अथवा आकसानं बोलताना बघितलं नाही. उलटपक्षी ते प्रत्येकाप्रती आत्मीयतेनं बोलायचे. त्यांना स्टेजवर ऐकणं ही तर मोठी पर्वणीच असायची. खरं सांगायचं तर ते रसायनच काही वेगळं होतं. त्यांनी गायलेल्या गाण्यांना बुवांनी दिलेल्या चाली तर अप्रतीमच होत्या, पण चालींना रामदासजींचा आवाज लाभल्यामुळे त्या अधिक चांगल्या रितीनं लोकांपर्यंत पोहोचल्या, असं मला वाटतं. त्यांनी गायलेली सगळीच गाणी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहेत. गाण्यांना अन्य कोणाचा आवाज असता, तर ती गाणी इतकी संस्मरणीय झाली असती की नाही, अशी शंका वाटते. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’,‘साद देती हिमशिखरे’, ‘प्रेम वरदान’ अशी अनेक आणि ‘मीरामधुरा’ नाटकातली सगळी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ‘मीरामधुरा’ हे नाटक फारसं गाजलं नसलं तरी त्यातली गाणी खूप गाजली. अभिषेकीबुवांनी रामदासजींबद्दल बोलताना एकदा मला सांगितलं की, ‘मी एखादी चाल लावली आणि ती कठीण वाटली, तर बाकीचे गायक ती चाल थोडी सोपी करण्याबद्दल सांगतात. मी चालीत थोडा फार बदल करावा, असं त्यांना वाटत असतं. पण रामदास कामत हा असा गायक आहे, जो मी सांगेल तसंच गाणं म्हणतो. गळ्यातून उतरत नाही, तोपर्यंत ती चाल घोटत राहतो. त्यानं एकदाही मला एखादी चाल सोपी करून देण्याचा आग्रह केला नाही. एकदा त्याच्या गळ्यात चाल उतरली की, तो असा काही गातो की ऐकणाऱ्यानं ऐकत राहावं...’ अभिषेकींबुवांचे हे शब्द आज मला प्रकर्षानं आठवत आहेत.

असा हा उत्तुंग क्षमतेचा गायक... पार्ल्याला त्यांची नेहमी भेट होत असे. अंगात अर्ध्या बाह्यांचा सदरा, पायजमा आणि हातात भाजीची एखादी पिशवी घेतलेले रामदासजी हनुमान रोडला अनेकदा भेटायचे. ‘मार्केटमध्ये गेलो होतो, आता घरी निघालो...,’ असं हसत हसत बोलायचे. खरं तर, आजच्या पिढीनं या दिग्गज व्यक्तिमत्त्वांतला साधेपणा अंगीकारायला हवा. पर्वताइतकी उंची गाठलेल्या या लोकांच्या वागण्या-बोलण्यात अत्यंत साधेपणा होता. तो त्यांनी शेवटपर्यंत जपला. रामदास कामत, भीमसेनजी, अभिषेकीबुवा, पं. वसंतराव देशपांडे, कुमारजी असं कोणाचंही रूप आठवा... यातल्या कोणीतरी कधी नक्षीचा कुर्ता घातल्याचं तरी दिसलं का? ठरावीक पांढऱ्या अथवा क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा अशा साध्या वेशात दिसणाऱ्या या लोकांनी गाठलेली उंची मात्र थक्क करून टाकणारी आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच आपण कोणी थोर असल्याचा अभिनिवेश दिसला नाही. आता अशी एक निरलस पिढी मागे पडत असल्याचं खूप दु:ख होतं.

रामदास कामत यांनी प्रदीर्घ काळ नोकरी सांभाळून ही संगीतसेवा केली. त्यांनी नाटकं बसवली, नवीन कलाकारांना नाट्यसंगीत कसं गावं याचे धडे दिले. त्यांनी अनेक चांगले गायक घडवले. मी ‘सर्वात्मका’ गायचो तेव्हा ते म्हणायचे,‘तू हे गातोस पण ते ‘क्लासिकल सर्वात्मका’ आहे. स्टेजवरचं ‘सर्वात्मका’ वेगळं आहे. बैठकीला बसल्यानंतर गायलं जाणारं गाणं, त्याचं मॉड्युलेशन वेगळं होतं तर स्टेजवर बाजूला दुसरं पात्र असताना तेच गाणं, आवाजाचं मॉड्युलेशन वेगळं होतं. सांगितलेल्या या बारकाव्यातूनच त्यांचा गाण्याचा प्रचंड अभ्यास समजू शकेल.
नव्या कलाकारांना घेऊन अरविंद पिळगावकर आणि रामदास कामत यांनी अनेक जुनी नाटकं पुन्हा बसवली. आज रामदास कामत आपल्यात नाहीत. पण त्यांचा आवाज अजरामर आहे. पुढच्या अनेक पुढ्या त्यांची गाणी ऐकतील आणि त्यावर अभ्यास करतील. त्यांना विनम्र आदरांजली.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)
Comments
Add Comment

हवामान बदलाशी सामना : भारताचा ११ वर्षांचा चढता आलेख

भूपेंद्र यादव मानवनिर्मित हवामान बदलाचे परिणाम सध्या संपूर्ण जगभर जाणवू लागले आहेत. आंतरसरकारी हवामान बदल

आक्रमक सत्ताधारी अन् दिशाहीन विरोधक

महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकर आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या

नारीशक्तीची डिजिटल भरारी

सावित्री ठाकूर प्रगतीची नवी व्याख्या पूर्वी डिजिटल साक्षरता मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होती, मात्र तिची

पप्पा सांगा कुणाचे?

स्वाती राजे कित्येक वर्षं या बातमीने काळजात घर केलं होतं. ही मुलगी पुढे काय करेल? कशी राहील? कशी जगली असेल?

शुभांशूची अभिमानास्पद भरारी

अजय तिवारी गेल्या दोन-तीन दशकांमध्ये भारताचा अंतराळ कार्यक्रम त्याच्या आर्थिक प्रगतीमुळे ठळकपणे दिसू लागला.

युद्ध सरले, विजय कोणाचा?

अजय तिवारी इस्रायलने १३ जूनच्या रात्री इराणवर अचानक हवाई हल्ला केला. त्यामुळे पश्चिम आशियात एक नवे युद्ध सुरू