नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी साडेचार वाजता कोरोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठा मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Ministers of all states today at 4:30 pm via video conferencing on the COVID situation
(File pic) pic.twitter.com/a3RRwOclfz
— ANI (@ANI) January 13, 2022
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली.
रविवारी झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांमधील लसीकरण वेगाने करण्यासंदर्भातील निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही मोदी या बैठकीत म्हणाले होते. याआधीही २०२० पासून पंतप्रधानांनी वेळोवेळी अशापद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकी घेतल्या आहेत.
दरम्यान, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल, असे म्हटले जात आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनसंदर्भात विचार केली जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील, असा दावा केला जात आहे.
दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा मोठी वाढ दिसून येत असल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढणारी राज्ये आणि इतर राज्ये असे वेगळेवेगळे नियम लावण्यासंदर्भातील शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या बैठकीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर्सची संख्या, आयसीयू बेड्सची संख्या, पीएसए यंत्रणा, ऑक्सिजन बेड्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या, लसीकरणाची सद्यस्थिती यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. तसेच ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.