मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. यावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले, “मराठी भाषेत नाव लिहीण्याविषयी आम्हाला कोणताही आक्षेप नाही. फेडरेशनने २००१ मध्ये एकाच गोष्टीबद्दल आक्षेप घेतला होता, तो म्हणजे मराठी फाँट साईझ इतर भाषांपेक्षा मोठी असावी असे सरकारने तेव्हा सांगितले होते. त्यावर आमचा आक्षेप होता. या मूलभूत हक्कावरून कोर्टाने स्टे दिला होता.
शहा म्हणाले की, २००८ मध्येही राजकीय पक्षांनी हंगामा केला होता. तेव्हाही दुकानांच्या पाट्या तोडण्यात आल्या होत्या. हायकोर्टाने पुन्हा ती स्थगिती कायम ठेवली होती. आजही आमची हीच विनंती आहे. नावाच्या फलकावर मराठी वापरण्याला आमचा काहीही आक्षेप नाही. पण शब्दांच्या आकारावरून आमच्यावर सक्ती करण्यात येऊ नये. मराठीचा आम्ही आदर करतो. प्रत्येक भागात मराठी असायला हवी. मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इथे लोक वेगवेगळ्या भागातून येतात. त्यामुळे याचा अधिकार दुकानदारांना असायला हवा, असे शहा म्हणाले.
‘हे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकाचे’
राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्र शेअर केले आहे. “या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावे लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.