Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीसण संक्रांतीचा- कालचा, आजचा

सण संक्रांतीचा- कालचा, आजचा

क्षितिजा देव

आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. असे म्हणतात की, सूर्याच्या रथाला सात घोडे लागतात आणि या दिवसापासून त्याचे उत्तरायण सुरू होते. या उत्तरायणाचा पुढचा सहा महिन्यांचा काळ अत्यंत शुभ असतो. या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करायला जास्त वेळ मिळतो आणि जास्त धान्य पिकवता येते.

संक्रांतीच्या सणाची गंमतच आहे. एखाद्या माणसाला आपण अगदी सरळ ‘गोड बोला’, असे सांगू शकतो. वर त्याच्या हातात तिळाची वडी ठेवली की मोकळेपणाने हसतो. एरवी असे आपण कोणाला सांगू शकतो का? मला वाटते म्हणूनच हा सण एवढा लोकप्रिय असावा. या एका वाक्याने दुरावलेली नाती जोडली जातात. शाळा-कॉलेजमध्ये एखादे भांडण होऊन दुरावलेल्या मैत्रिणीशी पुन्हा गट्टी करायला तिळगुळ देण्याचा हा राजमार्ग आपण कितीदा तरी वापरला होता. खरंच, किती छान सोय केली आहे नाही या सणाने!

यातून ‘फरगेट अँड फरगीव्ह’ हा संदेश मिळत असावा. नव्या ओळखी जोडण्यासदेखील तिळगुळ देणे हा गोड मार्ग आहे. विशेषतः तरुण प्रेमवीरांना याचा खूप उपयोग होत असावा! प्रेम करायला शिकवणारा, नातीगोती जोडणारा हा सण तसा भारतभर प्रिय आहे. तो ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा होतो. पंजाबमधे लोहडी, आसाममध्ये भोगाली वा बीहू,उत्तराखंडमध्ये उत्तरायणी, ओडिसामध्ये माघमेला, तामिळनाडूमध्ये पोंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत. गुजरातमध्ये तर हा सण ‘पतंगनो तहेवार’ म्हणजेच पतंगाचा सण या नावाने प्रसिद्ध आहे. नावाप्रमाणेच तिथं त्या दिवशी पतंगाचा अनुपम महोत्सव चालतो.
(अद्वैत फीचर्स)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -