Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘दास्तान फाट्याचा संग्राम’ पोवाड्याचे उद्घाटन

‘दास्तान फाट्याचा संग्राम’ पोवाड्याचे उद्घाटन
कल्याण : दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला म्हणूनच भूमिपुत्र आपल्याच भूमित राहिला. हे फक्त आणि फक्त दि. बा. पाटील यांच्यामुळेच घडले आहे, असे उद्गार आगरी सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी दास्तान फाट्याचा संग्राम या पोवाड्याच्या उद्घाटन प्रसंगी काढले. १३ जानेवारी दि. बा. पाटील यांची जयंती या निमित्ताने दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अजय पाटील यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. १३ जानेवारी रोजी जासई येथे गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या दिनकर बाळू पाटील उर्फ दि. बा. पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, अन्यायग्रस्तांसाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांना न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. १९८४ रोजी दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी जासई गावाजवळील दास्तान फाट्याजवळ मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मे तर शेकडो जखमी झाले. दि. बा. यांच्या शौर्याने दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला आणि येथील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळाला. साडेबारा टक्के विकसित भूखंड तसेच शेतजमिनीला योग्य भाव हे दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळे शक्य झाले. त्याच आंदोलनाचा संग्राम अजय लिंबाजी पाटील यांनी पोवाड्याद्वारे आणला आहे. १३ जानेवारी दि. बा. पाटील यांची जयंती याच दिवशी या पोवाड्याचे शानदार उद्घाटन ठाणकर यांनी करून दि. बा. यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ठाणे तर आभार अजय पाटील यांनी मानले.
Comments
Add Comment