लखनऊ : देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर आता उत्तर प्रदेशात राजकीय नाट्य चांगलेच रंगल्याचे दिसते. विरोधक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विविध कारणांवरून घेरत असताना आता भाजपातील काही दिग्गजांनी ऐन निवडणुकीआधीच पक्षाला ‘राम राम’ केला आहे.
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला असून, ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत पक्ष सोडणारे चौहान हे सहावे नेते आहेत. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर भाजप नेत्यांची दिल्लीत चर्चा झाली होती. दिल्लीत झालेल्या या बैठकांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्य मंत्रिमंडळ सोडले होते. त्यानंतर भाजपचे आणखी एक आमदार अवतार सिंग भडाना यांनी पक्ष सोडला आणि समाजवादी पार्टीचे सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला.
मौर्य यांच्या समर्थनार्थ भाजपच्या इतर तीन आमदारांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली. मंगळवारी, भाजप आमदार ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे भगवती सागर यांनी आपण पक्ष सोडत असल्याची घोषणा केली होती.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे दोन आमदार काँग्रेसचे नरेश सैनी आणि सपामधील हरी ओम यादव हे दोघेही बुधवारी भाजपमध्ये सामील झाले.