संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने सारे थांबविले आहे. उद्योजक, व्यावसायिक तर अक्षरश: काय करायचे, या विवंचनेत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांत गाडी थोडी रुळावर येतेय असे वाटत होते; परंतु सारे पुन्हा बिघडले. कोरोना, ओमायक्रॉन की, आणखी कसलीशी तापसरीच्या साथीने सारे हैराण झाले आहेत. शासकीय यंत्रणाही याबाबतीत हतबल आहे. आरोग्य यंत्रणा गेल्या दोन वर्षांत थकली आहे. जनतेचीही सारी घुसमट चालू आहे. व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्या-त्या व्यवसायात असणाऱ्या मालिकेतले अनेकजण पुढे काय करायचे, या विवंचनेत आहेत. गेली दोन वर्षे याच पद्धतीने गेली आहेत. कोरोनाने जनतेचा आनंद हिरावला आहे. रोजच्या जगण्याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि मनात असते. व्यावसायिकांची ही स्थिती तर नोकरीतील अस्वस्थता वेगळीच आहे.
कोकणात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. पावसाचा उशिरापर्यंत मुक्काम झाल्याने कोकणात फळपिकांसाठी थंडी आवश्यक होती. ती आता कुठे पडली आहे. उशिराच्या पावसाने सारे ऋतूचक्रच बिघडविले आहे. यामुळे कोणत्याच गोष्टी ठरविता येणाऱ्या नाहीत. सारेच अस्थिर झाले आहे. कोकणात डिसेंबर, जानेवारी हा खरं तर पर्यटन व्यवसायाला चालना देणारा हंगाम मानला जातो. पर्यटन व्यवसायातून पैसे कमावण्याचा सीझनच या बंदीमुळे परिणामकारक ठरत नाहीय. सर्वच बाबतीत असणाऱ्या निर्बंधांची चौकट पाळताना त्याचा साहजिकच परिणाम हा होतच असतो.
एकीकडे गेली दोन वर्षे पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. यातून उभं राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच पुन्हा कोलमडून पडायला झालं. कोणत्याही व्यवसायाची त्यावर अवलंबून असणाऱ्यांची एक साखळी तयार झालेली असते. अवलंबून असणारे दुसरं काही करू शकत नाहीत. यामुळे जे काही काम आहे, ते करण्याशिवाय पर्याय नसतो. आज राज्यातील ही संभ्रमित करणारी स्थिती कोकणातही आहे. कोरोनाचे सारे नियम आणि निर्बंध पाळतच काम करावयाचे असते. नियम, निर्बंध पाळलेच पाहिजेत. विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम याबाबतीत उपस्थितांची संख्या मर्यादित असावी, असे वाटते. नियम असला तरीही हा नियम बासनात गुंडाळून ठेवण्यात येतो. वास्तविक यामुळेही कोरोनाचा प्रसार होत आहे; परंतु कोणी कोणास काय बोलावं, काय सांगावं हा प्रश्न उपस्थित होणे, स्वाभाविकच आहे.
सध्या कोकणात थंडी आहे. मधेच दुपारच्या वेळी उष्मा असतो. या वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वत्र होत असतो. या वातावरणातील बदलामुळेच थंडी, ताप, सर्दीचे प्रमाण वाढले आहे
यावेळी कोकणातील प्रत्येक कुटुंबात सध्या चार-दोन माणसं सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत. व्हायरल असल्याने याची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्दी, खोकला असणारे आजारी रुग्ण गावो-गावी आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियमावलीत सर्दी, ताप हा रोग नाही. सर्दी, तापाचे कितीही रुग्ण असले तरीही आरोग्य यंत्रणा त्याबाबतीत तसा काही विचार करीत नाहीत. गावो-गावच्या डॉक्टर्सकडे सर्दी, तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. सतत ताप येत असेल तरच त्याची कोरोना चाचणी केली जाते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही सध्या वाढतीच आहे. फक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मागील वेळी फार भयभीत व्हायचे. आता मात्र भीतीचे वातावरण नाही, तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देखील उपचार घेऊन बरा होता, ही सकारात्मकता समाजात चर्चेत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम समाजमनावर दिसून येतो. लोक घाबरत नाहीत. मात्र काही रुग्णालयांतील डॉक्टर्सकडूनच घाबरविले जाते. त्यामुळे रुग्णावर त्याचा परिणाम होतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात आरोग्याशी संबंधित असणाऱ्यांचा धंदा चौपट झाला. काही रुग्णालयांनी कोरोनाची भीती घालून रुग्णांना हैराण केले. तशा तक्रारीही आरोग्य विभाग, शासकीय विभागांकडे करण्यात आला; परंतु या व्यवसायात मुरब्बी आणि मुरलेल्यांनी रुग्णांच्या असहाय्यतेचा जेवढा गैरफायदा घेता येईल तेवढा घेतला. रुग्णाचा नातेवाईक आणि रुग्ण दोन्ही मजबूर असतात. न्यायप्रक्रियेत निदान वरच्या न्यायालयात दाद तरी मागता येते; परंतु डॉक्टर सांगेल आणि म्हणेल ती पूर्वदिशा अशी स्थिती असते. तेथे कोणाचा शहाणपणा चालत नाही. डॉक्टर जे काही सांगतील ते प्रमाण मानून चालावे लागते. याचाच फायदा उठविला जातो. असंख्य सेवाभावीपणे आरोग्यसेवा करणारे सेवाव्रती आहेत; परंतु काही जणांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळत जे केले जाते ती बाब ‘देवमाणूस’ या उक्तीला लाज वाटणारी असते.
कोरोनाने गेल्या दोन वर्षांत अनेक गोष्टी शिकवल्या, दाखवल्या, अनेक जागी साक्षात देवमाणसं दिसली, तर काही बाबतीत माणसातील विकृती आणि स्वार्थीपणाही दिसला. माणसातील लुटारू वृत्तीचे दर्शन अनेक जागी घडले. काही क्षेत्रात त्याला पारावर उरला नाही. हे केवळ कोकणातचा घडले असे नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले आहे. कोरोनाचे सावट दूर होत नाही, तोवर माणसातील ही लांडगेतोड वृत्ती थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. कोकणातील ही परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा ठेवूया. आजच्या घडीला कोकणात जाणवणारी थंडी, कोरोना आणि सर्दी-ताप अशा या विचित्र वातावरणात कोकणवासीय वावरत आहेत. याही परिस्थितीचा सामना करीत कोकणवासीय पुन्हा एकदा नवी उभारी घेईल.
[email protected]