चिरंजीव राहो !

नितीन सप्रे


रविवारी सकाळी सकाळी बातमी मिळाली ती नाट्यसंगीत, भावसंगीताच्या प्राचीवर प्रदीर्घ काळ तळपणाऱ्या गोमंतकीय अरुण कमलाच्या शनिवारच्या मावळतीची. शनिवारच्या ‘निशेचा तम’ आता कधीच सरणार नव्हता. मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ गायक नट रामदास कामत यांच्या निधनाची बातमी मनाला हुरहूर लावून गेली.



रामदास कामत आणि माझी ओळख तशी फार जुनी. सुमारे ५० वर्षांपूर्वीची. मी प्राथमिक शाळेच्या दुसऱ्या अथवा तिसरीला असेन. नागपूर आकाशवाणी आणि माझ्या आईच्या सौजन्याने ही ओळख झाली. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनमधील सेवेमुळे ती अधिकच दृढ होत गेली. त्याकाळी सकाळी सहा वाजता अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीवर असायचा. सकाळी शाळेची तयारी आणि चहा, बिस्किटांच्या साथीला अर्चनेचे सकस सूर म्हणजे दिवसभराच्या नाट्याची दमदार नांदीच ठरायची. आपल्या खात्यावर किती अनमोल ठेवा जमा होतोय याची तेव्हा अजिबात नसलेली जाणीव आता मात्र पदोपदी होत असते.



तळकोकणात साखळी गावच्या वाचनालयाच्या मदतीसाठी बेबंदशाही नाटक बसवण्यात आलं होतं, त्यात पदेही घालण्यात आली. सात वर्षांचा रामदास तोंडाला रंग लावून बाळराजेंच्या भूमिकेत रंगभूमीवर नुसता अवतरलाच नाही, तर दोन पदेही जोरकसपणे गायला आणि पुढची प्रदीर्घ कारकीर्द उत्तरोत्तर वर्धिष्णूच होत गेली.



आई, वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी अशा घसघशीत कामत कुटुंबातलं रामदास हे शेंडेफळ. जन्म १८ फेब्रुवारी १९३१ चा, गोव्याच्या म्हापशातला. सांपत्तिक दृष्ट्या सुदाम्याशी नातं सांगणारं हे कुटुंब तसं समाधानी होतं, कारण घरात सुरांच ऐश्वर्य होतं. आई मथुरा, वडील शांताराम, भाऊ उपेंद्र आणि स्वतः रामदास यांच्या गळ्यात सुरांची मौक्तिक माला होती. गाण्याचं औपचारिक शिक्षण जरी नसलं तरी वडील दत्तपदे, नाट्यपदे गात असत, तर आई स्वयंपाक करता करता ओव्या, स्तोत्र, भजने आदी गात असे. भाई मुंबईत होता आणि गाण्याची तालीमही घेत होता, तोच छोट्या रामदासचा गुरू झाला. पुढे अर्थशास्त्राची पदवी घेऊन १९५३ मध्ये अकाऊंटंट जनरलच्या कार्यालयात त्यांनी नोकरी पत्करली. खर्डेघाशी करून फर्डे गायन करणारे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्यानंतरचे हे दुसरे उदाहरण म्हणता येईल.



दैवगती हा शब्द साधारणतः नकारात्मकतेने वापरला जातो. मात्र अनेकदा ती साथही देते. कामतांच्या बाबतीत त्याचा प्रत्यय येतो. त्यांचं कार्यालय असलेल्या सीजीओ इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आकाशवाणीचे कामकाज त्यावेळी होत असे. बा. सी. मर्ढेकर, राजा बढे, मंगेश पाडगावकर, यशवंत देव असे शब्दर्षी तिथेच त्यांच्या संपर्कात आले. शब्द सुरांचा मेळ झाला आणि आकाशवाणीवर रामदास कामत यांचा चंचुप्रवेश झाला. संगीत रंगभूमीवर त्यांचा प्रवेश झाला तो धी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशयकल्लोळ या नाटकातून. गंमत म्हणजे कामत आश्विन शेठची स्वप्नं बघत होते, मात्र दिग्दर्शक गोपीनाथ सावकारांनी त्यांना साधू बनवलं आणि ‘हृदयी धरा हा बोध खरा’ हे एकमेव पद त्यांच्या वाट्याला आलं. भाई उपेंद्रनी संधी न सोडण्याचा दिलेला सल्ला मानत त्यांनी तिचे सोने केले. हे पद त्यांनी असं काही सादर केलं की, रसिकजनांच्या हृदयी जागा मिळाली. त्यानंतर संगीत शारदा नाटकात कोदंडाची भूमिका साकारली आणि त्याबरोबरच पूर्वी नसलेला संगीतासाठीचा पहिला पुरस्कारही.



साठच्या दशकात मराठी संगीत नाटकाला संजीवन गुटी मिळाली ती कट्यार काळजात घुसली आणि मस्त्यगंधा या नाटकांमुळे. पण गंमत अशी की, मस्त्यगंधा नाटक सुरुवातीचे सुमारे ३८ प्रयोग पाण्याखाली होते. निर्मात्यांनी ते बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र देवाघरचे ज्ञात कुणाला?... यत्न तो देव जाणावा म्हटतात त्याप्रमाणे या नाटकातील पदांची ध्वनिमुद्रिका यावी यासाठी कामतांनी अनेक ट्रायल्स दिल्या आणि अखेरीस हेम लाभले. एका दिवसात ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ अशी चार पदं रेकॉर्ड झाली. एचएमव्हीच्या पैंगणकरांनी कामतांना ती सुपूर्द केली. शरद जांभेकर या पारखी मित्राने दोन- तीन दिवस ही चारही गाणी कामगार सभा, वनिता मंडळ अशा बिनीच्या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आणि किमया घडली. ‘दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा’ हे शब्दशः खरं ठरवत बंद होणाऱ्या या नाटकानं ३९व्या प्रयोगापासून नव्यानं जोम धरला.



रामदास कामत यांना व्रतस्थ कलाकार म्हटलं पाहिजे. ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ अशा अनेक संगीत नाटकांतून त्यांनी उत्तम अभिनय तसेच तडफदार आणि तळमळीनं सुरेल पदं सादर केली. त्यांनी फारशी चित्रपट गीतं गायली नाहीत, कारण एकतर वेळेची अनुपलब्धता आणि कदाचित नाट्यसृष्टीवर त्यांचं असलेलं पहिलं प्रेम ही कारणं असावीत. अर्थात, जे करायचं ते उत्तमच, या बाण्याने त्यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातील, खरोखरच जीव वेडावून टाकणारं सदाबहार गाणं म्हणजे ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’. आवाज खराब असतानाही, बार्शी मुंबई असा धकाधकीचा अनारक्षित रेल्वे प्रवास करून त्यांनी तो टेक दिला आणि ते गाणं अजरामर करून टाकलं.
अत्यंत कलासक्त जीवन जगलेला हा थोर गायक-नट आयुष्याच्या तिसऱ्या अंकाच्या उत्तरार्धात मन कृतार्थ शुभ्रतेने भरून आल्याची भावना राखून होता, हे विशेष. अशा कलेला समर्पित थोर गायक नटाच्या कलेवराची आज अग्निफुलं होत असताना कृतज्ञ रसिक एवढीच प्रार्थना करू शकतो.
चिरंजीव राहो... चिरंजीव राहो,
जगी नाम रामा।
जोवरि रविशशि पाव सुखधामा॥
नाद-सिद्धी सकळ वरदान देवो।
अचल राहो तुझा स्नेह अभिरामा॥
nitinnsapre@gmail.com
टीप : लेखक हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी. न्यूज, (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तिगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

मोदींची दूरदृष्टी: मिशन कर्मयोगी

सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात भारत काहीतरी अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. तो केवळ अधिकाऱ्यांच्या

कोकणात निवडणुकीची मोर्चेबांधणी...!

कोकणातील चारही जिल्ह्यांचा विचार करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेगट या दोन पक्षांचे प्राबल्य आहे.

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे

जातीपातीच्या लढ्यात मराठवाडा भरकटतोय!

जातीपातीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील जुने सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय पक्षांनी

मोहन भागवत : राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला

नवीन प्रभाग रचना ठरणार भाजपसाठी ‘गेमचेंजर’

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीचीच ठेवल्याचा आरोप झाला. त्यातच